Siddhant Sarfares Reaction On Prasad Oaks Statement: प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आणि मनोरंजन करणारा शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये एक स्किट पाहून अभिनेता प्रसाद ओकनं (Prasad Oak) एक वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे. प्रसाद ओकनं रिलस्टार्सबाबत वक्तव्य केलेलं. यावर अनेकांनी प्रसाद ओकचं समर्थन केलं आहे, तर अनेकांनी प्रसाद ओकचं म्हणणं चुकीचं असल्याचंही सांगितलं आहे. अशातच आता याप्रकरणी अभिनेता आणि रिलस्टार सिद्धांत सरफरे(Siddhant Sarfare) च्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसाद ओकच्या वक्तव्यावर बोलताना सिद्धांत सरफरे काय म्हणाला?
प्रसाद ओकनं रिलस्टार्सवर दिलेल्या प्रतिक्रियेवर बोलताना सिद्धांत सरफरे म्हणाला की, "मी अभिनेता आहे, रील्सवरती जरा स्लॅपस्टिक करावं लागतं ज्याला ओव्हर म्हणतात. पण मला आता पर्यंत जे मायबाप रसिक प्रेक्षकांचे प्रतिसाद आले आहेत. माझ्या अभिनयासाठी आणि माझ्या कन्टेंटसाठी ते सर्व काही सांगून जातात. नवोदित कलाकार कसा मोठा होणार? तर असा रील्स करून स्वतःची कला लोकांपर्यंत पोहोचवून. नाहीतर फक्त ऑडिशन ऑडिशन ऑडिशन... बस्स आणि मुळात मला बोलायचं कारण हेच की, मला रील्स या क्षेत्रात खूप काही अनुभवायला, शिकायला आणि आपली कला सादर करायला मिळाली. रिल करणारा हा अभिनेता नसतो असं नाही. खूप चांगले कलाकार सुद्ध रिल्स करू शकतात. फरक एवढाच आहे की टेलिव्हजन, सिनेमा तसं रिल्ससुद्धा एक कलाकाराला आपली कला दाखवण्याचा मार्ग आहे."
प्रसाद ओक नेमकं काय म्हणालेला?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये एक स्किट पाहून अभिनेता प्रसाद ओकनं प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी बोलताना प्रसाद ओक म्हणालेला की, "रील्स करुन आपण अभिनेते किंवा अभिनेत्री आहोत असं ज्यांना ज्यांना वाटायला लागलंय हा प्रचंड मोठा गैरसमज समाजात पसरत चाललेला आहे. ज्यांच्या रील्सला काही हजार, मिलियन, बिलियन व्ह्यूज आहेत, फॉलोअर्स आहेत त्यांचं नाटक बघायला 10 माणसंही येत नाहीत हे तथ्य आहे. त्यामुळे जर कोणाला वाटत असेल की आपण रील करुन स्टार होऊ शकतो तर हा खूप मोठा भ्रम आहे. रिल्स म्हणजे अभिनय अजिबात नाही. हा इतक्या महत्वाचा विषय अगदी हलक्या शब्दात तुम्ही मांडलात. ज्यांना कळायचं होतं शिकायचं होतं ते शिकतील नाही तर त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे. आपण आपलं काम केलं."
महत्त्वाच्या इतर बातम्या :