Siddarth Jadhav On Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सध्या 'बांबू' (Bamboo) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. दरम्यान, सिद्धार्थ जाधवने (Siddarth Jadhav) एक खास पोस्ट शेअर करत तेजस्विनी पंडितला शुभेच्छा दिल्या आहेत. 


सिद्धार्थने लिहिलं आहे,"तेजस्विनी पंडित अर्थात 'बंड्या' तू एक उत्तम अभिनेत्री आहेसच... तुला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे, तेव्हा तेव्हा तू आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहेस. आज एक निर्माती म्हणून तू लोकांसमोर येत आहेस, ही अभिमानाची गोष्ट आहे. सहाय्याक निर्माती म्हणून तू काम केलं आहेस, पण 'बांबू'च्या माध्यमातून निर्माती म्हणून तुझं नाव रुपेरी पडद्यावर झळकणार आहे". 


सिद्धार्थनं पुढे लिहिलंय,"माझी मैत्रिण आयुष्यात एक एक गोष्ट स्वत:च्या हिमतीवर मिळवतेय याचा विलक्षण आनंद आहे मला 'बंड्या'. 'येरे येरे पैसा' सिनेमातला सन्नी बबलीला म्हणतो ना "बबली, तू बडी हो गई रे", त्याचप्रमाणे हा तुझा मित्र बंड्या पण तुला हेच म्हणतोय,"तेजू तू बडी हो गई रे. आयुष्यात तू अजून खूप मोठी हो... एवढ्याच आभाळभर शुभेच्छा... आय लव्ह यू बंड्या... मला आहे आहे तू बोलशील मी तुला त्या नजरेने कधी पाहिलंच नाही... पण तरीही आय लव्ह यू." 






तेजस्विनीने मानले आपल्या सिद्धूचे आभार!


सिद्धार्थच्या या पोस्टवर तेजस्विनी पंडितने आभार मानत लिहिलं आहे, "थॅंक यू' हा खरचं छोटा शब्द आहे. खरंतर माझी ही धावपळ, स्ट्रगल, स्ट्रेस आणि माझ्या सगळ्या आनंदाच्या क्षणांचा तू कायम एक साक्षीदार म्हणून होतास. पण त्याही पलीकडे जाऊन तू माझा हात घट्ट धरुन उभा राहिलास. निस्वार्थपणा हा आपल्या इंडस्ट्रीत क्वचितच आढळतो. त्यामुळे तुझ्यासारखा मोठा तूच! बाकी काही कमावलं की, नाही माहिती नाही. पण, तुझ्यासारखा मित्र कमावला एवढं नक्की". 


तेजस्विनी पंडित आणि सिद्धार्थ जाधव मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. अनेक सिनेमांत त्यांनी एकत्र काम केलं आहे. तेजस्विनीचा 'बांबू' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेमात लागलेल्या अनेक 'बांबूं'ची गोष्ट प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तर सिद्धार्थ सध्या 'आता होऊ दे धिंगाणा' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Tejaswini Pandit : 'हे' लोक समोर आले की...; तेजस्विनी पंडितचा गौप्यस्फोट