Shubha Khote Husband Death : अनेक दशके मराठी-हिंदी सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. शुभा खोटे यांचे पती दिनेश बलसावर यांचे वृद्धपकाळाने निधन  झाले आहे. मागील काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. गुरुवारी, 28 मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. 


अभिनेत्री शुभा खोटे यांनी दिनेश बलसावर यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्री शुभा खोटे यांनी दिवंगत पती दिनेश बलसावर यांच्यासोबतच्या काही फोटोंचा कोलाज शेअर करत भावूक संदेश लिहिला आहे. शुभा खोटे यांनी म्हटले की, 60 वर्षे आम्ही एकमेकांना म्हणत आलो की, सोबत म्हातारे होऊयात, अजून आपल्या आयुष्यात आणखी सर्वोत्तम गोष्ट यायची आहे.   






 शुभा खोटे आणि दिनेश बलसावर हे 1960 मध्ये  विवाहबद्ध झाले होते. दिनेश बलसावर हे एका कॉर्पोरेट कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत होते. त्याशिवाय,  त्यांनी मराठी चित्रपट 'चिमुकला पाहुणा' मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती शुभा खोटे यांनी केली होती. 


अभिनेत्री भावना बलसावरची भावूक पोस्ट






'देख भाई देख' फेम अभिनेत्री भावना बलसावर ही शुभा खोटे आणि दिनेश बलसावर यांची कन्या आहे. भावना बलसावरनेही सोशल मीडियावर वडिलांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अतिशय साहसी आणि धाडसी असलेले दिनेश बलसावर हे आणखी या जगाला मागे सारत एका प्रवासाला निघाले आहेत. मात्र, त्यांच्या या प्रवासातील किस्से ते आम्हाला सांगू शकत नाही, अशी भावूक पोस्ट भावनाने लिहिली.