Shriram Nene Post On Madhuri Dikshit: आपल्या लावण्यानं, अभिनयानं आणि हास्यानं घायाळ करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सध्या 'कोण होणार करोडपती' चं सूत्रसंचालन करणार आहे. सोनी मराठीने अलीकडेच ही घोषणा केली. मराठमोळ्या अवतारात माधुरी दीक्षितची झलक असणारा खास प्रोमोही सध्या चर्चेत असून माधुरीला सूत्रसंचालनाच्या भूमिकेत पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. या प्रोमोवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. दरम्यान, माधुरीचा सूत्रसंचालनावर तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी एक खास प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेची सध्या एकच चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले डॉ श्रीराम नेने?
'कोण होणार करोडपती' या शोचं सूत्रसंचालन यंदा माधुरी दीक्षित करणार आहे. तिच्या सूत्रसंचालनाकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. दरम्यान, अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ श्रीराम नेणे यांनीही एक्स माध्यमावर एक पोस्ट करत अवघ्या पाच शब्दांची एक खास पोस्ट केली आहे. कोण होणार करोडपती ची बातमी शेअर करत ते म्हणाले ' Right on! What a perfect fit'. नेमक्या शब्दात लिहिलेली त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. या शोसाठी माधुरीची निवड अगदी योग्य असल्याचं त्यांनी म्हटलं.
सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर आधारित लोकप्रिय कार्यक्रम 'कोण होणार करोडपती'च्या (Kon Honaar Crorepati) नव्या पर्वाची घोषणा करत असून या पर्वातून महाराष्ट्राची लाडकी लेक आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित अभिनेत्री माधुरी दीक्षित (Actress Madhuri Dixit) सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या येण्यामुळे या लोकप्रिय कार्यक्रमात एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे आणि नव्या विचारांचा, नव्या ऊर्जेचा आणि नव्या स्वप्नांचा प्रवास सुरू होणार आहे कारण 'आता खेळ बदलणार'...
महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेल्या या प्रतिष्ठित मंचावर आता अभिनेत्री माधुरी दीक्षित सूत्रसंचलिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आता त्या आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत 'कोण होणार करोडपती'च्या नव्या पर्वाची सूत्रं हाती घेणार आहेत.
