मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' आता नव्या स्वरुपात येणार आहे. मात्र त्यातून निलेश साबळेचा पत्ता कट झाला असून त्या ठिकाणी अभिनेता अभिजीत खांडकेकर हा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यावरुन आता राशीचक्रकार शरद उपाध्ये यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे. कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून निलेश साबळेंच्या डोक्यात हवा गेली, पण गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते असं शरद उपाध्ये म्हणाले. निलेश साबळेंना दुसऱ्याबद्दल आदर नाही, त्यांचे सादरीकरणही आकर्षक नव्हते. या साऱ्याचा परिणाम त्यांना चॅनेलने काढून टाकल्याचं शरद उपाध्ये म्हणाले.
राज्यभरात गाजलेल्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्यामध्ये निलेश साबळे हे दिसणार नाहीत. त्यानंतर आता शरद उपाध्ये यांनी निलेश साबळेंच्या एकूण स्वभावावर बोट ठेवले आहे.
निलेश साबळेंना कुणाबद्दल आदर नाही
आपल्याला कार्यक्रमासाठी 11 वाजता बोलावले होते. त्या वेळी आपण शूटिंगसाठी वेळेवर उपस्थितही राहिलो. पण सायंकाळी 4 वाजले तरी कुणी फिरकले नाही, पाणीही दिलं नाही अशी तक्रार शरद उपाध्ये यांनी केली. त्यानंतरही कोणताही आदर न दाखवला निलेश साबळे अहंकारात फिरत होते असंही उपाध्ये म्हणाले.
दिवसभर बसवून ठेऊन संध्याकाळी 6 वाजता शुटिंगसाठी बोलावले आणि 15 मिनिटात उरकून टाकलं. त्यामुळे आपला दिवस वाया गेला असं शरद उपाध्ये म्हणाले. त्यानंतर आपण निलेश साबळे यांना वडिलकीच्या नात्याने काही सल्लेही दिल्याचं उपाध्ये यांनी स्पष्ट केलं.
अभिजीत खांडकेकर यांचा सहवास आपल्याला लाभला आहे, ते सगळ्यांना घेऊन जाणारे आहेत असं शरद उपाध्ये म्हणाले. ते या कार्यक्रमाची धुरा व्यवस्थितपणे पार पाडतील असा विश्वासही शरद उपाध्ये यांनी व्यक्त केला.
Sharad Upadhye Facebook Post : काय म्हटलंय शरद उपाध्येंनी?
आदरणीय निलेशजी साबळे,
'आपल्याला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजीत खांडकेकरांना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. वाईट वाटले पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलवले होते. त्याप्रमाणे मी 11 वाजता पोहोचलो.पण 3 वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते. पण एकादोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत. मला रुम सोडू नका असे सांगितले होते. निलेश, तुम्ही इतर कलावंतांच्या रुममध्ये जाऊन गप्पा मारीत होतात. पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट 4 वाजता, स्माईलही न देता स्टेजवर गेलात.
इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला 6 वाजता बोलावून घाईघाईत 15 मिनिटात सारे आटोपले. त्यावेळीही इतर कलावंत मधेमधे बोलत होते. माझा सारा दिवस फुकट गेला. एडिटिंगमध्येही माझी उत्तरे गाळलीत. बाहेर आपली भेट झाली तेव्हा वडिलांच्या नात्याने काही सल्ले दिले.
पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती. दुसऱ्यांबद्दल आदर ठेवायचा असतो. पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटले की अहंकार अति वाईट. गर्विष्ठ माणसाचे अध:पतन होते. एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो.
स्टेजवर तुम्ही साऱ्यांना आपलेसे केले नाही. आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते. या साऱ्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले. निलेशजी, स्वभाव मनमिळाऊ असावा. साऱ्यांना सांभाळून घ्यावे. मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल.
अभिजीत खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात. त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा.
आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती.