मुंबई : उद्धव ठाकरे काही झालं तरी राज ठाकरेंना पक्षात स्थान देणार नाहीत. कारण तसं झालं तर उद्धव ठाकरेंचं अस्तित्व धोक्यात येईल अशी प्रतिक्रिया भाजप खासदार नारायण राणेंनी दिली. विधानभवनात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानाचा एक हिस्सा राज ठाकरेंना देणार का असा खोचक सवालही राणेंनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरेंनी कुटुंब म्हणून किती जणांना जवळ केलं असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला. राज ठाकरे पक्षात असताना उद्धव ठाकरेंनी खूप छळलं. राज ठाकरेंना पक्ष सोडण्याची इच्छा नसताना पक्ष सोडायला भाग पाडल्याचा आरोप नारायण राणेंनी केला.
उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात शिवसेना संपवली
ज्या मराठी माणसाने शिवसेनेला ताकद दिली त्याच मराठी माणसाची वाट उद्धव ठाकरेंनी लावली. 40 वर्षांत बाळासाहेबांनी शिवसेना उभारली. पण तीच शिवसेना अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांनी संपवली असा आरोप नारायण राणे यांनी केला.
नारायण राणे म्हणाले की, "मुंबईत फक्त 18 टक्के मराठी उरलेत. 1960 साली ते 60 टक्के इतके होते. मराठी माणसाला मुंबई बाहेर काढण्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. आजच त्यांना मराठी कसे आठवले? उद्धव ठाकरे दोन दिवस मंत्रालयात आले. मराठी तरुणांसाठी रोजगार मिळावा यासाठी त्यांनी काय केलं? मराठीचा एवढा पुळका आला असेल तर स्वतःच्या मुलाला स्कॉटिश इंग्रजी शाळेत का टाकलं? शरद पवार, सोनिया गांधींसोबत गेल्यानंतर त्यांना मराठी आठवली नाही का?"
कोण भरत गोगावले?
नारायण राणे असंच इतक्या मोठ्या पदापर्यंत गेले आहेत का? त्यांनी त्यासाठी मारामाऱ्या, मर्डर केल्याचा उल्लेख एका भाषणात मंत्री भरत गोगावलेंनी केला होता. त्याला आता नारायण राणेंनी उत्तर दिलं. कोण भरत गोगावले असं म्हणत राणेंनी गोगावलेंच्या वक्तव्याला उत्तर दिलं.
ही बातमी वाचा :