Sharad Ponkshe On Chhaava Movie: 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) संपूर्ण देशभरात गाजतोय. चित्रपटावर फक्त प्रेक्षकच नाहीतर, समिक्षकांकडूनही 'छावा'वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अभिनेता विक्की कौशलनं (Vicky Kaushal) चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका साकारली आहे, त्यामुळे त्याच्या कामाचं कौतुक होतं आहे. एकीकडे सिनेमाचं कौतुक होतंय, तर दुसरीकडे सिनेमाबद्दल सोशल मीडियावर अनेक वाद निर्माण झालेत. याच वादाविषयी आता अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी परखड मत मांडलं आहे. 

Continues below advertisement

अभिनेते शरद पोंक्षे नेहमीच आपलं परखड मत मांडत असतात. अशातच आता 'छावा' चित्रपटावरुन निर्माण झालेल्या वादासंदर्भातही त्यांनी इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर करुन आपलं मत मांडलं आहे. शरद पोंक्षे म्हणाले की, "नमस्कार, छावा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि सगळा हिंदू समाज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर नितांत प्रेम करणारे सगळे अचानक एकवटले. हिंदूंना एक होण्यासाठी काहीतरी कारण लागतं. आपण सगळे एकवटलो, सिनेमा सुरू झाला, सिनेमा खूप चालायला लागला आणि त्याच्यावर वाद-विवाद सुरू झाले. मग वंशजांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली. दोन्हीकडून वाद-प्रतिवाद सुरू झाले. मारामारी सुरू झाली. भांडणं सुरू झाली. पण या सगळ्या भानगडीमध्ये एक गोष्ट मात्र राहूनच गेली. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार करून जे हाल केले, म्हणजे, क्रूरतेचं शेवटचं टोक गाठलं तो औरंग्या मात्र बाजूलाच राहिला."

"खरंतर सिनेमा बघितल्यानंतर जसं सगळ्या महाराष्ट्रात सध्या काही घडलं तर एखाद्या नेत्याच्या फोटोवर चप्पला वगैरे मारतात, थुंकतात, असे प्रकार घडतात. तसंच खरंतर औरंगजेबाच्या प्रतिमेवरती चप्पला मारायला हव्या होत्या. त्याचे पुतळे ठिकठिकाणी महाराष्ट्रात, हिंदूस्थानमध्ये जाळले जातायत, असं चित्र दिसायला हवं होतं. दिसलं काय? मराठा विरुद्ध ब्राह्मण समाज. मराठे म्हणणार, आमचे पूर्वज असे नव्हते. तुमच्या ब्राह्मणांनी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मारलं. मग ब्राह्मण म्हणणार, आमच्याकडे दोन-चार होते. तुमच्या मराठ्यांनी छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांचं नुकसान केलं. ते जास्त गद्दार होते. मग मराठे म्हणणार, तुम्हीच सत्यानाश केलाय. नंतर ब्राह्मण म्हणणार, तुम्हीच सत्यानाश केला. या सगळ्या भानगडीत एक विसरून जातोय औरंग्या बाजूलाच राहतोय."

Continues below advertisement

"औरंग्याबद्दल राग, द्वेष नसानसात मिसळायला हवा होता. औरंगजेबाच्या विरोधात जी आग पेटायला हवी होती ती विझली. आग कोणामध्ये पेटली ब्राह्मण आणि मराठ्यांमध्ये, म्हणजेच हिंदू-हिंदूमध्ये आग पेटली. हाच हिंदू जातीला लागलेला शाप आहे. आपण कधी विचार करणार आहोत, कधी?", असं शरद पोंक्षे यांनी पुढे म्हटलं आहे.

दरम्यान, 'छावा' चित्रपटात विक्की कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर, रश्मिका मंदाना हिनं महाराणी येसूबाईंची भूमिका निभावली आहे. तसेच, या चित्रपटात मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना दिसून आला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Vicky Kaushal Chhaava Movie Dialogue: "ती ओळ स्क्रिप्टमध्ये नव्हतीच, राजेंचं ॲडिशन..."; 'छावा' सिनेमातील 'त्या' सीनचा किस्सा तुम्हाला माहितीय?