Sharad Pawar :  कलाकारांसाठी आणि नाट्य रसिकांसाठी नाट्यगृह हा फार जिव्हाळ्याचा विषय आहे. काही महिन्यांपासून मुंबईतील गिरणगांव परिसरातील दामोदर नाट्यगृहाचा वाद सुरु आहे. परिसरातील दामोदर नाट्यगृह आणि सोशल सर्विस लीग शाळेच्या सध्या पुनर्विकासाचं काम सुरु आहे. पण या दामोदर नाट्यगृहावर हातोडा पडल्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी उपोषणाचा इशारा दिला. कारण दुसऱ्या जागी नाट्यगृह उभारण्याला विरोध करण्यात येत आहे. आता यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे विश्वस्त शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाट्यगृहांसाठी भूमिका घेतली आहे. 


आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित नाटककार गो.ब.देवल यांच्या स्मृतिदिनी नाट्य परिषदेच्या पुरस्कारांचं वितरण शुक्रवार 14 जून रोजी करण्यात आलंय. या कार्यक्रमाला आखिल भारतीय नाट्यपरिषदेचे विश्वस्त शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारही उपस्थित होते. याच सोहळ्यात शरद पवारांनी नाट्यगृहांसाठीची भूमिका मांडली आहे. 


शरद पवारांनी काय म्हटलं?


नाट्यगृहाविषयी बोलताना शरद पवारांनी म्हटलं की, नाट्यगृह चालवणं हे पांढऱ्या हत्तीसारखं आहे. त्यामुळे नाट्यगृह ताब्यात घेण्यापेक्षा नाट्यगृहावर टँक्स, करमणूक कर, वीज, देखभालीची जबाबदारी जर सरकारनं घेतली तर नाट्य संस्था फायद्यात येतील. त्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडेही जाऊयात आणि काही मार्ग निघतोय का बघुयात. त्यामुळे आता नाट्यगृहांसाठी नाट्य परिषदेचे विश्वतच मैदानात असल्याचं म्हटलं जातंय. 


नाट्यगृहांची असणारी अवस्था, तिथे होणारी गैरसोय याबाबत वांरवार कलाकारांकडून भाष्य करण्यात आलं आहे. पण अद्यापही अनेक नाट्यगृहांची परिस्थिती निराशाजनक असल्याचं कलाकारांकडूनच सांगण्यात येतं. त्यामुळे आता या सगळ्यामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त शरद पवार हे स्वत: लक्ष घालणार असल्याचंही पाहायला मिळतंय. त्यातच शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यामध्ये जातीने लक्ष घाल्यणाचं आवाहन केलं आहे. त्यामुळे यावर आता राज्याचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.                                       


ही बातमी वाचा : 


Ashok Saraf on Sharad Pawar : शरद पवार माझे आवडते नेते, माझं एक काम त्यांनी तीन मिनीटांत केलं होतं : अशोक सराफ