Sharad Kelkar Movie Raanti : मराठी चित्रपटात अनेक प्रयोग होत असतात. सकस पटकथेसह आता मराठीत अॅक्शनपटही येऊ लागले आहेत. आपल्या भारदास्त आवाजाने आणि अभिनयाने सिनेइंडस्ट्रीत छाप सोडणारा अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) आता 'रानटी' भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी शरद केळकर याने बाप्पाचा आशीर्वाद घेत आपण नवीन कलाकृती करत असल्याचे सांगत चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. आता, शरद केळकरचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला आहे. वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणणारे दिग्दर्शक समित कक्कड या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच ‘रानटी’ नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो उपजत गुणधर्म असतो. त्याला जगण्यासाठी शिकार करावी लागते, हल्ले करावे लागतात. पण, ह्या हल्ल्याना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त ‘रानटी’ असतो. या कथेचा नायक असाच ‘रानटी’ बनला असल्याचे चित्रपटाच्या टीमने सांगितले.
लाँच झालेल्या पोस्टरवरून हा ‘रानटी’ चित्रपट अॅक्शनपट असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. मराठी सिनेमांत आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेल्या दिग्दर्शनाची शैली, थरारक अॅक्शन दृश्य, जबरदस्त पटकथेचा जॉनर आणि अचूक संकलन हे ‘रानटी’ चित्रपटात पहायला मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पोस्टरवरील शरद केळकरचा खुँखार लूक हा चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद केळकरने सांगितले की,'अधर्मी वृत्तींचा नाश करणार्या विष्णूची भूमिका मी यात केली आहे. अशा प्रकाराची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समित कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद असल्याची प्रतिक्रिया शरदने व्यक्त केली.
समित कक्कडचे दिग्दर्शन
या चित्रपटाचे दिग्दर्शन समित कक्कड ह्यांनी केले आहे. 'धारावी बँक', 'इंदोरी इश्क', 'हाफ तिकीट', 'आयना का बायना', 'आश्चर्यचकीत', '36 गुण', अशा भन्नाट कथानकांची स्टाईल हाताळणारे दिग्दर्शक समित कक्कड यांच्याकडून चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. श्वास रोखून ठेवणारा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आजवरच्या आपल्या कामाद्वारे समित कक्कड यांनी रसिकांसोबतच सिनेसृष्टीचंही मन जिंकलं आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेली पॉवरफुल्ल अॅक्शन, एंटरटेनमेंट ‘रानटी’ चित्रपटातून पहायला मिळणार आहे. या चित्रपटातून महाराष्ट्रातील न्यू ‘अँग्री यंग मॅन’ शरद केळकरच्या रूपाने मिळणार असल्याचे समित यांनी सांगितले. समित कक्कड फिल्म्स प्रॉडक्शन्स आणि सन्स ऑफ साॅइल मीडिया प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने येणार्या या चित्रपटाच्या निर्मीती पुनीत बालन यांनी केली आहे. आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून कायम उत्तम कलाकृतीला पाठिंबा देणारे निर्माते पुनीत बालन म्हणाले की, 'रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने एक चांगली टीम झाली आहे. दिग्दर्शक समित कक्कड याने नेहमीच आपल्यातील वेगळेपण दाखविला आहे. त्याच्या साथीने मराठीत एक वेगळा प्रयत्न आम्ही ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे. हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल,असेही बालन यांनी सांगितले.
अजित परब यांनी संगीत दिले असून अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत आहे. एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण आहे. तर, आशिष म्हात्रे यांनी संकलनाची जबाबदारी पार पाडली आहे.