मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानकडून कोरोनाच्या या महामारीत मोठी मदत केली जात आहे. अलिकडेच अभिनेता शाहरुख खानने महाराष्ट्र सरकारला 25 हजार पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) कीट पुरविल्या. कोरोनाच्या या संकटात शाहरुखची पत्नी गौरी देखील मागे नाही. प्रोड्यूसर गौरी खानने देखील गरजूंच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. मुंबईतील तब्बल 95 हजार गरजूंच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. गौरीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लॉकडाऊनच्या काळात अनेक मजूर आणि हातावर पोट असणाऱ्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. अत्यावश्यक सुविधांशिवाय इतर सारं काही बंद असल्यामुळे या लोकांच्या उत्पन्नाचे मार्ग बंद झाले आहेत. यामुळे त्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी शक्य होईल त्याप्रमाणे गरजूंना मदत केली आहे.

आता गौरी खान या नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. तिने तब्बल 95 हजार गरजूंच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये ती मीर फाउंडेशनच्या सहकार्यातून जेवण देत आहे. 'रोटी बँक फाउंडेशन आणि मीर फाउंडेशन यांच्या सहयोगाने मुंबईतील 25 हजार गरजू नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. ही तर खरी सुरुवात आहे. अजून अशी बरीच काम करायची आहेत' असं गौरीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.


Coronavirus | कोरोनाविरूद्धच्या लढ्यासाठी शाहरूख खान करणार मदत; ट्विटरवरून दिली माहिती

बॉलिवूडचा किंग खान देखील कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी धावून आला आहे. त्याने आपली कंपनी रेड चिलीज एन्टरटेन्मेंट, रेड चीलीज वीएफएक्स, आयपीएल क्रिकेट टीम कोलकत्ता नाइट रायडर्स आणि आपल्या मीर फाऊंडेशनमार्फत मदत करणार असल्याचं यापूर्वीच सांगितलं आहे. सोबतच शाहरुख खान ने महाराष्ट्रात 25,000 पीपीई किट देखील दिल्या असल्याचं समोर आलं होतं. शाहरूख खान कशाप्रकारे आणि कुठे मदत करणार, याबाबतची माहिती रेड चिलीज एन्टरटेन्मेंटच्या ट्विटर हॅन्डलवर शेअर करण्यात आली आहे. याबाबत दोन पानांचं एक स्टेटमेंट जारी करण्यात आलं होतं. ज्यामध्ये मदतीबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या स्टेटमेंटनुसार, किंग खान आपल्या कंपन्यांमार्फत मुंबई, दिल्ली आणि कोलकत्ता या शहरांमध्ये मदत करणार आहे.

'सध्याच्या वेळी हे गरजेचं आहे की, ज्या व्यक्ती आपल्यासाठी मेहनत घेत आहेत, त्या तुमच्याशी निगडीत नाहीत, तुमच्यासाठी अनोळखीदेखील असतील, त्या लोकांना पटवून द्या ते एकटे नाहीत. आपण सर्व एकमेकांसाठी काहीतरी करू. भारत आणि सर्व भारतीय एक कुटुंब आहे.', असं शाहरुखनं म्हटलं होतं. शाहरूख खानने आपल्या स्टेटमेंटमध्ये पुढे लिहिलं आहे की, 'रात्रीनंतर एका नव्या दिवसाची सुरुवात होणार आहे, हा दिवस बदलणार नाही, तारिख मात्र नक्की बदलेल.' याचसोबत शाहरूख खानने सर्वांसाठी आणि सर्वांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना केली आहे. तसेच त्याने लोकांना सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचं आवाहनदेखील केलं होतं.