Shabana Azmi Health Update: सीजेपी आंदोलनात सक्रिय सहभाग घेत असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी (Shabana Azmi) यांची प्रकृती बिघडली आहे. 74 वर्षीय शबाना आझमी यांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. त्यांच्या टीमने अधिकृत निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे.शबाना आझमी यांना 102 अंश ताप असून त्यामुळे त्या नियोजित आंदोलनात सहभागी होऊ शकल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनात त्यांना दम्याचा अटॅक आल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
शबाना आझमी यांना पूर्ण बेड रेस्ट
स्वाइन फ्लूचे निदान होण्यापूर्वीही जंतर-मंतर येथे आयोजित सभेदरम्यान शबाना आझमी यांची प्रकृती अचानक खालावली होती. अशक्तपणा आणि अस्वस्थता जाणवल्यानंतर सुरक्षा कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने वैद्यकीय केंद्रात दाखल केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्या पूर्णपणे बेड रेस्टवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून शबाना आझमी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात सक्रियपणे सहभागी होत होत्या. त्या आंदोलनकर्त्यांसोबत व्यासपीठावर उपस्थित राहत होत्या. तसेच, त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आंदोलनाशी संबंधित फोटो, व्हिडिओ आणि विविध अपडेट्सही सातत्याने शेअर केले होते.
शबाना आझमी यांना नेमकं झालंय काय?
शबाना आझमी यांच्या टीमने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, "शबाना आज आंदोलनात सहभागी होणार होत्या. मात्र त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. त्यांना 102 अंश ताप असून डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे." ही माहिती समोर आल्यानंतर त्यांचे चाहते आणि हितचिंतक त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत आहेत.
शिक्षण व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली होती. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करत त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिले होते, "आपल्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि संपूर्ण यंत्रणेच्या आमूलाग्र बदलासाठी आम्ही जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळी युवा सहकाऱ्यांसोबत जात आहोत. देशाच्या प्रगतीचे आणि यशाचे खरे मोजमाप करायचे असेल, तर सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या (GDP) किमान ६ टक्के निधी शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासाठी खर्च केला गेला पाहिजे."
