मुंबई : 'दिया और बाती हम', या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री दीपिका सिंह हिला नेटकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करणं तिला चांगलंच महागात पडलं आहे.
सोमवारी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागाला तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. चक्रीवादळामुळं सोसाट्याचा वारा सुटल्यामुळं शहरातील बहुतांश भागात मोठे वृक्ष उन्मळून पडले. चक्रीवादळामुळं काही काळासाठी हवाई आणि रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली होती. सखल भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं पाणी साचण्याच्याही घटना पाहायला मिळाल्या होत्या. यातच देशावर आलेल्या कोरोना संकटाचा मुद्दा वेगळाच.
देश आणि शहर संकटात असताना अनेक सेलिब्रिटी मंडळींनीसुद्धा परिस्थितीचं गांभीर्य जाणत आपल्या परिनं सर्वांनाच घरात राहण्याचं आवाहन केलं. पण, या साऱ्यामध्ये अभिनेत्री दीपिका सिंह गोयल हिनं मात्र एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती एका उन्मळून पडलेल्या मोठ्या वृक्षासमोरच पावसात भिजत नृत्य करताना दिसली.
'नृत्य करण्यासाठी वादळ शमण्याची वाट पाहणं हे आयुष्य नव्हे... आयुष्य म्हणजे पावसात नृत्य करायचा शिकणं...', असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं. हा व्हिडीओ पोस्ट करताच तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. कृपया तू असे व्हिडीओ प्रसिद्ध करु नकोस, असं एका युजरने लिहिलं तर दुसऱ्याने चक्रीवादळात लोकांचे प्राण गमावत असणाऱ्या नृत्य करणाऱ्या दीपिकावर नाराजी व्यक्त केली. समोर इतकं मोठं झाड उन्मळून पडलं आहे आणि ही अभिनेत्री त्यासमोर नृत्य करत आहे, याला म्हणावं तरी काय... अशा शब्दांतही दीपिकाला नेटकऱ्यांनी झापलं.