Select City Walk Theatre Fire: विक्की कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) स्टारर 'छावा' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. चित्रपट कमाईच्या बाबतीत दररोज नवनवे आकडे रचत आहे. प्रेक्षकही चित्रपटावर भरभरून प्रेम करत आहेत. रुपेरी पडद्यावर छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा पाहाण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहे. अशातच एका थिएटरमध्ये 'छावा'चा शो सुरू होता. स्क्रिनिंग सुरू असतानाच आणि अगदी क्लायमॅक्स जवळ आलेला असतानाच थिएटरमधल्या स्क्रिननं पेट घेतला. या घटनेनंतर थिएटरमध्ये एकच गोंधळ माजला. लोक घाबरले, भितीनं सैरावैरा पळू लागले, आरडाओरडा करू लागले. 

बुधवारी संध्याकाळी येथील सिलेक्ट सिटीवॉक मॉलमधील एका सिनेमा हॉलमध्ये 'छावा'चं स्क्रिनिंग सुरू असतानाच अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'छावा' चित्रपट सुरू असतानाच अचानक लागली आग

एका प्रत्यक्षदर्शीनं पीटीआयला सांगितलं की, मॉलमधील पीव्हीआर सिनेमाच्या चित्रपटगृहाच्या एका कोपऱ्यात संध्याकाळी 4.15 वाजता 'छावा' चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान आग लागली. ज्यामुळे चित्रपट पाहणाऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं.

अग्निशमन दलाच्या मदतीनं आग आटोक्यात 

दुसऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं की, हॉलमध्ये फायर अलार्म वाजू लागताच सर्वजण बाहेर पडण्यासाठी दाराकडे धावले. त्यांनी सांगितलं की, सिनेमा हॉल रिकामा करण्यात आला आहे. दिल्ली अग्निशमन सेवेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, त्यांना संध्याकाळी 5.42 वाजता आगीबद्दल फोन आला आणि अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. दरम्यान, ही आग किरकोळ होती आणि त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असंही त्यांनी सांगितलं. सायंकाळी 5.55 वाजेपर्यंत आग आटोक्यात आली.

पोलीस घटनास्थळी दाखल

दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, त्यांना साकेत सिटीवॉक मॉलमध्ये संध्याकाळी 5.57 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. "आम्हाला आग लागल्याची माहिती मिळाली आणि फोन करणाऱ्यानं पोलिसांना कळवलं की काही लोक आत अडकले आहेत. पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि आग विझवण्यात आली. आगीमुळे कोणीही जखमी झाले नाही," असं पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे.

पीव्हीआर साकेत येथे किरकोळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, परंतु कोणतेही नुकसान झाले नाही आणि परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणण्यात आली, असं निवेदनात म्हटलं आहे.

आगीच्या वेळी चित्रपट पाहत असलेले वीर सिंह यांनी पीटीआयला सांगितलं की, "सुरुवातीला सर्वांना वाटलं की, ते चित्रपटातील एक दृश्य आहे. जेव्हा लोकांना कळलं की, हॉलमध्ये आग लागली आहे आणि धूर येत आहे, तेव्हा लोक ओरडू लागले. ती एक छोटीशी आग होती. फायर अलार्म वाजताच, सिनेमा हॉलचे कर्मचारी आत आले आणि सर्वांना लवकर बाहेर पडण्यास सांगितलं."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhaava Box Office Collection Day 13: 'छावा'च्या डरकाळीनं सारेच हादरले; तेराव्या दिवशी 'स्त्री 2', 'पुष्पा 2' अन् 'जवान'ला पछाडलं