Bollywood Director Manish Gupta Allegations On Akshaye Khanna: 'धुरंधर'मध्ये (Dhurandhar) मुख्य भूमिकेत रणवीर सिंह (Ranveer Singh) झळकलाय, पण त्याच्याहून जास्त चर्चा झाली ती, अक्षय खन्नानं (Akshaye Khanna) साकारलेल्या रहमान डकैतची. त्यात अक्षय खन्नाची डान्स स्टेप तर चाहत्यांचं काळीज चोरुन घेऊन गेली. एकीकडे 'धुरंधर'साठी अक्षय खन्नावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. तर, दुसरीकडे मात्र, तो कसा मुजोर आहे, माज दाखवतो... त्याच्या डोक्यात कशी प्रसिद्धीची हवा गेलीय, अशा प्रकारचे आरोप त्याच्यावर केले जात आहेत.
अक्षय खन्ना सध्या वादात अडकला आहे. 'दृश्यम 3'मधून (Drishyam 3) त्यानं घेतलेल्या एग्झिटबद्दल दररोज नवी माहिती समोर येत आहे. निर्माते कुमार मंगर यांनी यापूर्वीही सांगितलं होतं की, अभिनेत्यानं सिनेमा सोडण्यापूर्वी अॅडव्हान्समध्ये फीसुद्धा घेतलेली. 'आर्टिकल 375' सिनेमाच्या शुटिंगदरम्यानही त्यांनी अभिनेत्याला पाठिंबा दिला होता, जेव्हा कोणीही तसं करण्यास तयार नव्हतं. आता, चित्रपटाचे लेखक मनीष गुप्ता यांनी कुमार मंगर यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे आणि त्यावर आपली प्रतिक्रियासुद्धा दिली आहे.
दिग्दर्शक, लेखर मनीष गुप्ता नेमकं काय म्हणाले?
'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत मनीष यांनी सांगितलं की "2017 मध्ये अक्षयने माझा सिनेमा 'सेक्शन 375' साईन केला होता. ज्याचं लेखन मी केलं होतं आणि दिग्दर्शनही करणार होतो. तर कुमार मंगत यांनी सिनेमाची निर्मिती केली होती. अक्षयचं मानधन 2 कोटी रुपये ठरवण्यात आलं होतं. 21 लाख रुपये अॅडव्हान्स घेऊन त्यानं कॉन्ट्रॅक साईन केलेलं. पण, नंतर त्यानं आम्ही ज्या तारखा ठरवल्या होत्या. त्याच तारखा 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' सिनेमासाठी दिल्या. आणि त्या सिनेमाच्या शूटिंगसाठी तो थेट लंडनला निघूनही गेला. त्यामुळे आम्हाला 6 महिन्यांसाठी शूटिंग पुढे ढकलावं लागलं..."
"त्या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर अक्षय परत आला आणि त्यानं मानधनात वाढ करत 3.5 कोटींची मागणी केली. त्यासोबतच त्याला सिनेमावरही पूर्ण कंट्रोल हवा होता. त्याला सगळं काही त्याच्या पद्धतीनं करायचं होतं. पण, अभिनेत्यांच्या मनाप्रमाणे वागणारा आणि त्यांच्या पद्धतीनं चालणारा दिग्दर्शक मी नाही... त्यामुळे मी अक्षय खन्नाला तेव्हा विरोध केलेला... अक्षय खन्नाचा अहंकार दुखावल्यामुळे त्यानं निर्मात्यांवर दबाव आणून मला दिग्दर्शकाच्या पदावरुन काढून टाकलं आणि दुसरा दिग्दर्शक आणला. त्यासोबतच माझी स्क्रिप्ट आणि प्री प्रोडक्शनचं ड्राइव्ह ज्यावर मी तीन वर्ष काम करत होतो तेदेखील त्यांनी जप्त केलं...", असंही मनीश गुप्ता यांनी पुढे बोलताना सांगितलं.
मनीष गुप्ता पुढे बोलताना म्हणाले की, "मी अक्षयला सांगितलं होतं की, मी त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. मी निर्माता कुमार मंगत यांनाही नोटीस पाठवली होती. मी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करत असतानाच कोर्टाच्या बाहेर कुमार मंगत यांनी माझ्यासोबत बोलून हे प्रकरण मिटवलं. पण हास्यास्पद गोष्ट म्हणजे, आज कुमार मंगत अक्षय खन्नाच्या या चुकीच्या वागणुकीची फळं भोगत आहेत. आता त्यांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे..."