मुंबई : शॉन कॉनरी यांच्या निधनानं अवघं जग हळहळलं. शॉन कॉनरी यांनी रंगवलेल्या जेम्स बॉंडने नवा नायक जन्माला घतला होता. 1962 ते 1973 अशी दहा पर्षं त्यांनी बॉंड रंगवला. पण 31 ऑक्टोबर 2020 रोजी वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जगभरातल्या कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अनेक हिंदी कलाकारांनीही आपआपल्या परीने शॉन यांना श्रद्धांजली वाहिली. अमिताभ बच्चन यांनी मात्र शॉन यांच्या निधनाच्या तारखेचं गणित मांडून अंतिम उत्तर 007 करून दाखवलं.


शॉन कॉनरी यांनी जेम्स बॉंड कमालीचा यशस्वी केला. म्हणून त्यांना आयुष्यभर झीरो झीरो सेव्हन हा बॉंडचा नंबर चिकटला. अर्थात शॉन यांनी तो दिमाखाने मिरवला. अमिताभ यांनी त्या तारखेचं गणित घालून 007 हा आकडा तयार केला आहे. शॉन यांचं निधन झालं ३१ ऑक्टोबर २०२० ला. यातून अमिताभ म्हणतात, शॉन यांचं निधन 31-10-2020 ला झालं. याची बेरीज करायची. तर 3 + 1 होतात 4. त्यात पुढे 1+0 म्हणजे झाले 5. त्यानंतर २०२० वर्षातले पहिला दोन घेऊन 5+2 होतात 7. मग पुन्हा ०. म्हणजे 3+1+1+2 बरोबर 7 आणि दोन शून्य म्हणजे 007.





अमिताभ यांनी शॉन यांच्या निधनाची तारीखही कशी 007 आहे हे पटवून दिलं आहे. त्यांची ही पोस्टही बरीच व्हायरल होते आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांनीही त्याला दाद दिली आहे. शॉन यांच्या जगण्यात 7 आकडा कसा महत्वाचा होता हेच जणू अमिताभ बच्चन यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.


शॉन कॉनरी यांनी जेम्स बाँडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. शॉन कॉनरी हेच पहिल्यांदा जेम्स बाँड रंगवताना रुपेरी पडद्यावर दिसले होते. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी सलग सात चित्रपटांमध्ये जेम्स बाँड या गुप्तहेराची भूमिका केली. त्यांनी पुढची अनेक दशके चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांना एक ऑस्कर, दोन बाफ्टा आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले होते. गेल्या ऑगस्ट महिन्यातच शॉन कॉनरी यांनी वयाची 90 वर्षे पूर्ण केली होती.