Santosh Juvekar On Chhaava Movie Trolling: 2025 मधल्या हिट सिनेमांची यादी काढली तर, विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा' सिनेमाचा (Chhaava Movie) नंबर पहिला लागतो. लक्ष्मण उत्तेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित या सिनेमानं संपूर्ण देशभरात धुवांधार कमाई केली. या सिनेमात विक्की कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्यासोबत अनेक मराठी कलाकारांची मादियाळी होती. याच सिनेमाच मराठी अभिनेता संतोष जुवेकरनंही महत्त्वाची भूमिका साकारलेली. फिल्मच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतीत बोलताना संतोष जुवेकरनं (Santosh Juvekar) अक्षय खन्नाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ पाहायला मिळालेला. संतोष जुवेकरला त्याच्या वाक्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागलेला. अशातच एबीपी माझाच्या 'माझा कट्ट' कार्यक्रमात बोलताना संतोष जुवेकरनं ट्रोलिंगबाबत आपलं मन मोकळं केलं आहे.
गाजलेलं मराठी नाटक 'घाशीराम कोतवाल' हिंदीमध्ये रंगभूमीवर येत आहे. यामध्ये संतोष जुवेकर 'घाशीराम कोतवाल' ही भूमिका साकारणार आहे. याचनिमित्तानं संतोष जुवेकर एबीपी माझाच्या 'माझा कट्ट' कार्यक्रमासाठी उपस्थित होता. याच कार्यक्रमात संतोषला 'छावा' सिनेमावेळी झालेल्या ट्रोलिंगबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी माझ्या भावना खूप चुकीच्या पद्धतीनं पोहोचवल्या गेल्या, असं उत्तर संतोषनं दिलं आहे.
संतोष जुवेकरन नेमकं काय म्हणाला?
'छावा' सिनेमावेळी अक्षय खन्नाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे झालेल्या ट्रोलिंगवर बोलताना अभिनेता संतोष जुवेकर म्हणाला की, "22 वर्षं झाली या क्षेत्रात काम करतोय, पण इतकी वर्ष केलेल्या कामातून जी प्रसिद्धी मिळाली नाही. ती प्रसिद्धी यामुळे मिळाली... 'छावा चित्रपट आला तेव्हा मला खूप ट्रोल केलेलं. त्यावेळी मी एका चॅनेलसाठी मुलाखत दिलेली आणि त्यामधील काही भाग काढून, माझ्या भावना खूप चुकीच्या पद्धतीनं पोहोचवल्या गेल्यात..."
"ज्यांनी ती मुलाखत पूर्ण पाहिली, त्यांनी मला मेसेज करून सांगितलं की, आम्हाला काहीच चुकीचं वाटलं नाही. तू योग्य बोलला आहेस. पण, ज्यांना थोडंसंच बघून, ट्रोल करण्याची खूप घाई असते, त्यांनी त्या मुलाखतीतील अर्धवट भाग पाहून, 'अरे, बघ हा काय बोलला', असं केलं. परंतु त्यांनी मागचं-पुढचं काहीच पाहिलं नव्हतं.", असं संतोष जुवेकर म्हणाला.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या इतर बातम्या :