Santosh Juvekar : सिनेमांतल्या भूमिकांसाठी कलाकार काय-काय करत असतात. एखादं दृश्य खरं वाटावं यासाठी जीव ओतून मेहनत घेतात. काही कलाकार चित्रपटातील आपल्या कॅरेक्टरला योग्य न्याय देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मेहनत किंवा रिस्क घ्यायला मागे पुढे पहात नाहीत. मराठीसोबतच हिंदीतही सक्रीय असणारा महाराष्ट्राचा लाडका अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) याबाबतीत नेहमी आघाडीवर असतो.  


आगामी ‘रानटी’ चित्रपटात शरद केळकरच्या बालपणीच्या जिगरी मित्राची ‘बाळा’ची भूमिका साकारणाऱ्या संतोषने आपल्या भूमिकेसाठी चक्क संपूर्ण केसांचे टक्कल करून घेतलं. तसेच पायाने अपंग व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.  प्रदर्शित झालेल्या पोस्टरवरून त्याचा खतरनाक अंदाज पाहायला मिळत आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


संतोष जुवेकरची नवी भूमिका


अभिनेता संतोष जुवेकर त्याच्या दमदार भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘बाळा’च्या भूमिकेसाठी त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, मेकअपच्या साथीने भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी संतोषने घेतलेली मेहनतही नक्कीच मोलाची ठरते. या गेटअप मध्ये धावण्यापासून ते अगदी अॅक्शन सीन करण्यापर्यंतची मेहनत घेत ही भूमिका संतोषनी साकारली आहे. या वेगळ्या भूमिकेचं आव्हान स्विकारत संतोषनी  घेतलेली मेहनत ‘रानटी’ चित्रपटात दिसून येणार आहे.  


'भूमिकेचं सोनं करण्यासाठी मी वाट्टेल ती मेहनत घेईन...'


आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना संतोष सांगतो कि, ‘कोणतीही भूमिका एकरूप होऊन केली की ती प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचते,  दिग्दर्शक समित कक्कड कडून मला नेहमी  माझ्यातल्या अभिनयाला वाव देणाऱ्या भूमिका ऑफर झाल्या आहेत. त्याच्या  चित्रपटात काम करण्यासाठी माझा उत्साह व्दिगुणीत होतो. भूमिकेचं सोनं करण्यासाठी मी वाट्टेल ती मेहनत घेतो. ‘रानटी’ चित्रपटातील माझी ही खलनायकी भूमिका प्रेक्षकांना ‘बाळा’च्या प्रेमात पाडेल. ‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे. 






ही बातमी वाचा : 


Seema Chandekar : वयाच्या 57व्या वर्षी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय का घेतला? सीमा चांदेकर यांनी सांगितलं कारण