Sanjay Raut on Balasaheb Thorat , संगमनेर, अहिल्यानगर : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.14) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात हजेरी लावली. यावेळी संजय राऊत यांनी तुम्हाला बाळासाहेब थोरातांनी काय कमी केलं, त्यांना तुम्ही विधानसभेला का पाडलं, असा थेट सवाल संगमनेरकरांना केला. यावेळी बाळासाहेब थोरात हे सुद्धा मंचावर उपस्थित होते. बाळासाहेब थोरातांनी आपल्या भाषणादरम्यान संजय राऊत यांनी महाविकास आघाडी बनवण्यात कशी भूमिका बजावली याची आठवण संगमनेरकरांना सांगितली.
संगमनेर तालुक्यातील डीग्रस या गावात बुवाजी महाराज देवस्थानच्या हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला संजय राऊत यांनी हजेरी लावली. यावेळी मंदिरात दर्शन घेताना महाराजांनी संजय राऊतांना इच्छा व्यक्त करण्यास सांगितले. मात्र संजय राऊतांनी त्यावेळी कोणतंही भाष्य केलं नाही. मात्र नंतर जाहीर कार्यक्रमात संजय राऊतांनी आपल्या भाषणात या प्रसंगाचा उल्लेख केला. संजय राऊत म्हणाले, "देवस्थानच्या महाराजांनीच शिवसेना चिन्ह आणि नाव याचा निकाल तुमच्या बाजूने लागावा असं साकडे देवाला घातल्याचं मला सांगितलं"
दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही तोफ डागली. "एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरमध्ये रक्तदान केलं. मात्र मी स्वतः पत्र लिहून गद्दारांचं रक्त सैन्यासाठी वापरू नका असं आव्हान करणार आहे" असं संजय राऊत म्हणाले. संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला याचं शल्य केवळ मलाच नव्हे तर महाराष्ट्राला आहे असं देखील संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत नेमकं काय काय म्हणाले?
मी गेली चार पाच वर्षे सातत्याने इथे येतो. मला जेव्हा निमंत्रणाचा फोन आला तेव्हा मी दिल्लीत राहुल गांधींसोबत पोलिसांच्या ताब्यात होतो. इथली माणसं गोड आहेत, आग्रह मोडता येत नाही. या देवस्थानावर माझी श्रद्धा बसली आहे. दर्शन घेताना पुणेकर बाबांचा आवाज आला पक्ष आणि चिन्ह परत मागा. बाळासाहेब थोरातांनी शाळा दिली, पाणी दिलं, मात्र तुम्ही त्यांना विधानसभेत पाठवलं नाही. आम्हाला याची खंत आहे. खोटेपणाचा विजय का झाला? बाळासाहेब थोरात विधानसभेत गेले नाही याचे शल्य आजही आहे. आमच्या सरकारने जनतेसाठी काय करायचे बाकी होते?. कोरोना काळात ठाकरे सरकारने जनतेला वाचवण्याचे काम केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र आमचं सरकार गद्दारी करून पडण्यात आलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या