Sangharsh Yoddha Box Office Collection : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर आधारित 'संघर्षयोद्धा' (sangharsh yoddha) हा सिनेमा 14 जून रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. पण पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये सुरु केलेला मराठा आरक्षणाचा लढा या सिनेमात दाखवण्यात आला आहे. पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत नसल्याचं चित्र सध्या आहे. 


सहा दिवसांत या सिनेमाने 50 लाखांचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवशीही या सिनेमाने फक्त 8 लाखांचा गल्ला जमवला होता. तर सहव्या दिवसापर्यंत या सिनेमाची कमाई ही 4 लाखांवर आली. त्यामुळे या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर फार काही जादू करता आली नाहीये. 


संघर्षयोद्धाचं 6 दिवसांचं कलेक्शन


सॅनसिल्कच्या वृत्तानुसार, संघर्षयोद्धा सिनेमाने पहिल्या दिवशी 8 लाख रुपये, दुसऱ्या दिवशी 9 लाख रुपये, तिसऱ्या दिवशी 16 लाख रुपये, चौथ्या दिवशी 9 लाख रुपये, पाचव्या दिवशी 4 लाख रुपये, सहाव्या दिवशी 4 लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची जादू फार काही चालली नाही. 


संघर्षयोद्धा सिनेमाची रिलीज डेटही बदलली


मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करणारे दोन मराठी सिनेमे तयार झाले. त्यामधील संघर्षयोद्धा - मनोज जरांगे पाटील हा सिनेमा 14 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला. तसेच आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा हा सिनेमा येत्या 21 जून रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. संघर्षयोद्धा हा सिनेमा सुरुवातीला 21 जून रोजी प्रदर्शित होणार होता, पण निर्मात्यांनी या सिनेमाची तारीख बदलली आणि 14 जून रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्याच दिवशी आम्ही जरांगे हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार होता. पण संघर्षयोद्धामुळे आम्ही जरांगे सिनेमाची तारीख बदलण्यात तरीही. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर आठवडाभर आधी रिलीज होऊनही कमाई मात्र काही लाखांमध्येच असल्याचं पाहायला मिळतंय. 


संघर्षयोद्धाला आम्ही जरांगे सिनेमाचं आव्हान


येत्या शुक्रवारी म्हणजेच 21 जून रोजी 'आम्ही जरांगे' हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे संघर्षयोद्धा सिनेमासाठी थेट स्पर्धक बॉक्स ऑफिसवर येईल. त्यानंतरही संघर्षयोद्धाचा प्रवास खडतर होईल की सिनेमा वरचढ ठरेल हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच. दरम्यान संघर्षयोद्धा सिनेमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या देखील भूमिका आहेत. 


ही बातमी वाचा : 


Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Movie : "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर संघर्ष, तरिही निर्मात्यांची मोठी घोषणा