मुंबई : बॉलीवुडचा दबंग खान नेहमी फॅन सोबत ह्यूमन बीइंग सारखा वागतो हे आपण नेहमीच पाहतो. सल्लूचा बॉडीगार्ड शेरू हा सल्लूच्या फॅन्सना अटकाव करण्यात, मारहाण करण्यात नेहमी चर्चेत असतो. मात्र सल्लू शेरूच्या भूमिकेत दिसल्याने सगळ्याच्या भुवया उंचावल्या आहेत. सलमान खानचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीमध्ये सलमान चाहत्याच्या हातातून फोन हिसकावून घेताना दिसत आहे.


दबंग खान सलमान पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांवर संतापला आहे. गोव्याच्या दाबोळी विमानतळाबाहेर येत असताना एका चाहत्यानं सलमान खानसोबत सेल्फी काढण्यासाठी आपला मोबाईल कॅमेरा सुरू केला. सलमानला त्याचा राग आला. सलमाननं रागाच्या भरात चाहत्याच्या हातातला फोन खेचून घेतला. यावेळी सलमान रागानं लालबूंद झाला होता. सलमानच्या उर्मट वर्तनावर आता अनेकांकडून टीका केली जात आहे.

Salman Khan | सेल्फी घेणाऱ्या चाहत्यासोबत दबंग खानचं उर्मट वर्तन | ABP Majha



सलमान खान मंगळवारी (28 जानेवारी) काही कामानिमित गोव्यात आला होता. सकाळी साडे सात वाजता तो दाबोळी विमानतळावरील मुख्य प्रवेश द्वारावरुन बाहेर येत असताना त्याने केलेल्या एका कृत्याने त्याचे गोव्यातील फॅन दुखावले असून सोशल मीडिया वरुन सल्लूवर टीका केली आहे.

नेहमी प्रमाणे सलमान मुख्यप्रवेशद्वारातून बाहेर येत असताना त्याच्या पुढे असलेला एक फॅन मोबाइल कॅमेऱ्यावरुन सेल्फी घेत होता. त्याच्या मागून येणाऱ्या सलमानला ही गोष्ट आवडली नसावी. त्याने रागाने हात मारून त्याचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या बॉडी गार्डच्या गराडयातून सलमान निघुन जाताना दिसतो. बाहेर उभे असलेले फॅन देखील सलमानला हाक मारण्याचा प्रयत्न करतात पण सलमान तडक निघुन जातो. सलमानचा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला असून सोशल मीडियावरुन त्यावर टिकेची झोड उठवली जात आहे.

सलमानने ज्याला झटका दिला तो एका विमान कंपनीचा कर्मचारी असल्याची चर्चा असून अद्याप याप्रकरणी कोणतीच तक्रार दाखल झाली नसल्याचे विमानतळ सूत्रांनी सांगितले. आज दिवसभर गोव्यात सल्लू को इतना गुस्सा क्यो आया, याचीच चर्चा रंगली आहे.