Salman Khan : काही दिवसांपूर्वी  बॉलिवूडचा 'भाईजान' अशी ओळख असणाऱ्या सलमान खानला (Salman Khan) आणि त्याचे वडील लेखक सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमानला हे धमकीचं पत्र देण्यामागे बिश्नोई गँगचा खंडणीचा हेतू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.  धमकीचं पत्र मिळाल्यानंतर आता सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नुकताच सलमानला मुंबई पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना दिला आहे. जाणून घेऊयात सलमानच्या सुरक्षेबाबत... 


बुलेटप्रूफ गाडी
सलमानला सायकल चालवण्याची आवड आहे. अनेकग व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही सलमानला सायकल चालवताना पाहिलं असेल. पण धमकीचं पत्र मिळाल्यापासून सलमान बुलेटप्रूफ गाडीमधून प्रवास करणार आहे. पांढऱ्या रंगाच्या लँड क्रूजर या बुलेटप्रूफ गाडीमधूनच सलमान प्रवास करतो. 


सशस्त्र सुरक्षा रक्षकांचे पथक
सध्या सलमान गर्दीच्या कार्यक्रमांना जाण्याचे टाळत आहे. सलमान खानच्या सुरक्षेसाठी पूर्वी त्याचा खास आणि जुना बॉडीगार्ड शेरा त्याच्या साथीदारांसोबत फिरायचा. पण आता सलमानसोबत सशस्त्र सुरक्षा रक्षकांचे पथक असणार आहे.  


मिळाला शस्त्र परवाना
मुंबई पोलिसांनी सलमान खानला स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना (बंदुकीचा परवाना) दिला आहे. 22 जुलै रोजी सलमाननं आर्म्स लायसन्ससाठी अर्ज केला होता. तसेच त्यानं मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट देखील घेतली होती.  


कडक सुरक्षाव्यवस्थेत सलमाननं केलं ‘विक्रांत रोणा’चं प्रमोशन


‘विक्रांत रोणा’ चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटला सलमाननं हजेरी लावली होती.इव्हेंट सुरू होण्यापूर्वी साध्या वेशातील चार पोलीस बराच वेळ कार्यक्रमस्थळाची पाहणी करताना दिसले होते. ‘ताज लँड्स एंड’ हॉटेलच्या आवारात 3 गणवेशधारी पोलिसही उपस्थित होते. सलमानच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांनी सुमारे 45 मिनिटे पाहणी केल्यानंतर, सलमान खानच्या टीमच्या लोकांना खात्री पटली की, या कार्यक्रमस्थळी सलमानला कोणताही धोका नाही. त्यानंतर काही वेळाने सलमान खान पोलीस आणि खासगी सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यासह कार्यक्रम स्थळी आला.