Salman Ali : आज मराठी सिनेसृष्टीचा डंका संपूर्ण जगभर वाजत आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपासून पुरस्कार सोहळ्यांपर्यंत सर्वच ठिकाणी मराठीचा झेंडा डौलानं फडकत आहे. जागतिक पातळीवर मराठीनं सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवणाऱ्या मराठी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी आज बरेच कलाकार, गायक, संगीतकार आतुरले आहेत. अशांपैकीच एक असणाऱ्या इंडियन आयडॉल फेम सलमान अलीला 'अन्य' या आगामी चित्रपटामुळं मराठी भाषेचा गोडवा चाखण्याची संधी मिळाली आहे.


निर्माते शेलना के. आणि सिम्मी यांनी इनिशिएटीव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली कॅपिटलवुडसच्या सहयोगानं 'अन्य'ची निर्मिती केली आहे. लेखक-दिग्दर्शक सिम्मी जोसेफ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सिम्मी यांनी आजवर दक्षिणात्य चित्रपटांमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. हिंदीतील दिग्गज गायकांच्या पावलावर पाऊल टाकत सलमाननं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. मराठीसोबत हिंदी भाषेतही बनलेल्या 'अन्य' या चित्रपटानं सलमान अलीची मराठी चित्रपटात पार्श्वगायन करण्याची इच्छा पूर्ण केली आहे. या चित्रपटातील हिंदी गाण्यासोबतच मराठीतील 'ऐक पाखरा...' हे मराठी गाणंही सलमाननं गायलं आहे. प्रशांत जमादार आणि संजीव सारथी यांनी या गाण्याचं लेखन केलं असून, सुमधूर संगीतसाज चढवण्याची जबाबदारी संगीतकार रामनाथ यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. हिंदीमध्ये हे गाणे 'ओ रे परींदे...' असं असून, संजीव सारथी यांनी लिहिलं आहे. हे गाणंसुद्धा रामनाथ यांनीच संगीतबद्ध केलं आहे. 'अन्य'सारख्या समाजातील महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करण्याची संधी मिळाल्यानं आनंदी असल्याची भावना सलमाननं व्यक्त केली. यासाठी संगीतकार रामनाथ आणि दिग्दर्शक सिम्मी जोसेफ यांच्यामुळं हे शक्य होऊ शकले. 'ऐक पाखरा...' हे मराठी गाण्यात सुरेख शब्दरचना केली असून, त्याच तोलामोचं संगीत दिल्यानं गाणं गाताना एक वेगळंच फिलींग आलं. रसिकांनाही गाणं ऐकताना त्याची नक्कीच जाणीव होईल. याच गाण्याचं हिंदी व्हर्जन असणारं 'ओ रे परींदे...' हे गाणंही श्रवणीय झाल्याची भावना सलमाननं व्यक्त केली. 


'अन्य'मध्ये रायमा सेन, अतुल कुलकर्णी, प्रथमेश परब, तेजश्री प्रधान, भूषण प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे, यशपाल शर्मा आणि गोविंद नामदेव आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. समाजातील ज्वलंत मुद्द्यांकडे लक्ष वेधणारा 'अन्य' १० जून रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. 'अन्य'चं संवादलेखन महेंद्र पाटील यांनी केलं असून, सिनेमॅटोग्राफी सज्जन कालाथील यांची आहे.


हेही वाचा :