मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा तमाम मुंबई-पुणेकरांसाठी वरदान ठरला आहे. कारण, एरवी सातेक तासांवर असलेलं अंतर या द्रुतगती मार्गामुळे अवघ्या तीन-चार तासांवर आलं. इतर क्षेत्राप्रमाणे कलाजगतालाही याचा मोठा फायदा झाला. कारण, मनोरंजन क्षेत्रं मुंबईप्रमाणे पुण्यातही वाढू लागलं आहे. सिनेमांची चित्रकरणं, मालिकांची चित्रीकरणं आणि नाटकांचे प्रयोग यांच्यासाठी हा मार्ग जीवनदायिनी ठरला आहे. असं असतानाच आता या मार्गावरुन होणाऱ्या बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न सुटता सुटत नाही. संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर या मार्गावर होणाऱ्या नियामांच्या उल्लंघनाची व्यथा मांडली आहे. विशेष म्हणजे, सलील यांनी ट्वीट केल्यानंतर अभिनेता सुमित राघवननेही यातले इतरही अनेक मुद्दे मांडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच साद घातली आहे.


मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर होणारे अपघात मोठे असतात. मनोरंजनसृष्टीला याची वेळोवेळी किंमत मोजावी लागली आहे. अभिनेते आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे यांचा आघात आजही ही सृष्टी पचवू शकलेली नाही. पण त्या घटनेला इतकी वर्षं होऊनही एक्स्प्रेसवेवरच्या नियमांचं उल्लंघन वारंवार होताना दिसतं. याबाबत सलीलने ट्वीट करुन मुद्दा मांडला आहे. मुंबई-पुण्यादरम्यान प्रवास करताना या रस्त्यावरच्या तीनही मार्गिंकांवर चालवल्या जाणाऱ्या अवजड वाहनांचा फोटो ट्वीट करत आता एकवेळ कोरोनाची वॅक्सिन येईल पण आपण सुधारणार नाही अशी उपरोधिक पोस्ट केली आहे. त्याला अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स करत दुजोराच दिला आहे.


तर सलीलच्या याच पोस्टचा आधार घेत अभिनेता सुमित राघवन यानेही टोलनाक्यांवर होणाऱ्या असुविधेचा पाढा वाचला आहे. "या एक्सप्रेस वे आता जुन्या मुंबई-पुणे मार्गापेक्षा भयंकर झाला आहे. याला एक्स्प्रेसवे का म्हणायचं तेच मला अजून कळलेलं नाही. इथे असलेले टोल प्लाझा हा एक विनोद आहे. गाडीला फास्ट टॅग असूनही काही फायदा नाही. फास्ट टॅगच्या लेनमध्ये सर्रास सगळे घुसतात." ही पोस्ट करतानाच सुमितने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच टॅग करत आता त्यांनाच यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.





गेल्या काही काळापासून मुंबई-पुण्यावरच्या या मार्गावर सातत्याने बेशिस्त वाहतुकीचं वर्तन होतं. अनेक ठिकाणी नियम पाळण्याचे, वेग मर्यादेचे फलक लावूनही अनेक चालक बेदरकार वाहन चालवत असल्याचं दिसतं. अनेकदा अवजड वाहनं दुसऱ्या तिसऱ्या मार्गिकेतून जाताना दिसतात. त्यावर तातडीने उपाय योजना करावी अशी मागणी सर्वच स्तरातून होते आहे. कारण अभिनेता सुमित राघवन, डॉ. सलील कुलकर्णी यांनी या मुद्द्याला वाचा फोडली असली तरी व्यावसायिक, नोकरदार, कलावंत आदी सर्वांनाच या एक्स्प्रेस वेवरच्या बेशिस्त वर्तनाचा त्रास होतो.