Saif Ali Khan Attacked : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला. सध्या सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सैफची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना ही घटना फार चिंताजनक आणि त्रासदायक बातमी आहे. 


सैफ अली खानचं, तुमचं माझं कुणाचंही घर असू दे...


या घटनेच्या आलेल्या पहिल्या माहितीनुसार कोणीतरी अनोळखी माणूस घरामध्ये आलेला आहे, आता ते कशासाठी आणि कोणत्या कारणासाठी घरात आलेला आहे. हे पोलीस तपासात कळेलच. पोलिसांचं आणि सैफ अली खानच्या कुटुंबाचं स्टेटमेंट जेव्हा येईल त्याच्यानंतर बोलणं योग्य राहील. चिंताजनक अशी गोष्ट आहे. अशा पद्धतीने रात्री माणूस घरात घुसला, तो कोणाच्याही असू दे. म्हणजे सैफ अली खानचं, तुमचं माझं कुणाचंही घर असू दे, हे खूप चिंताजनक आहे आणि याची डिटेल चौकशी झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे. 


गेल्या काही दिवसात होत असलेल्या या हल्ल्याच्या घटना आणि आज सैफ अली खान वर झालेला हा हल्ला यांच्यात काही संबंध असेल असं मला वाटत नाही. या घटनेबाबत पोलिसांच्या माहिती शिवाय आपण बोलणं संयुक्तिक राहणार नाही. पण गुन्हेगारी कधी वाढते, जेव्हा आर्थिक परिस्थिती संकटात येतात तेव्हा, त्यामुळे मी बजेटच्या वेळी संसदेत बोलले होते आर्थिक परिस्थितीच्या बद्दल सरकारने अतिशय संवेदनशील असावं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सैफ अली खानच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबतचे डिटेल्स अद्याप आपल्याकडे आलेले नाहीत त्यामुळे ते आल्याशिवाय आपण बोलणं योग्य राहणार नाही, असंही सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांनी म्हटलं आहे.


सुप्रिया सुळेंनी केला फोन


सुप्रिया सुळे सैफच्या कुटुंबीयांशी फोनवर चर्चा केल्याचं 'एबीपी माझा'च्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फोनवरील व्यक्ती नेमकी कोण होती, हे समजू शकलेलं नाही. मात्र, ही व्यक्ती करिना कपूरची बहीण करिश्मा कपूर असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितले की, बेबो आणि सैफला सांग मी फोन केला होता. काय होतंय, ते मला सांगत राहा. काळजी घ्या. मी काही मदत करु शकत असेन तर मला सांगा, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितले असल्याचं दिसून आलं. 


नेमकं काय घडलं?


अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खान याच्या घरात चोरानं चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खान याच्या मुंबईतील घरात मध्यरात्री एक चोर शिरला होता. चोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरू केला. त्यावेळी सैफ अली खानला जाग आली. तो खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर एकमेकांच्या समोर आले. यावेळी चोरानं पकडलं जाण्याच्या भीतीनं त्याच्याकडील चाकूने सैफ अली खानवर वार केले. यामध्ये सैफ अली खान जखमी झाला आहे. तातडीनं मुंबईच्या लिलावती रुग्णालयात त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. या गोंधळात चोरानं पळ काढला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या घटनेची चौकशी करत आहेत.