Saif Ali Khan Attack Updates: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan Attacked Updates Marathi) याच्यावर (16 जानेवारी) च्या मध्यरात्री 2 वाजता प्राणघात हल्ला झाला होता. या प्रकरणी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम ऊर्फ विजय दासला अटक करण्यात आली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर मोहम्मद शरीफुल इस्लाम बांगलादेशी नागरिक असल्याचं समोर आलं. मुंबईत तो विजय दास म्हणून वावरत होता.
सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामला अटक केल्यानंतर त्याच्याकडून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. या चौकशीत मोहम्मद शरीफुल इस्लामकडून विविध धक्कादायक खुलासे केले जात आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्याच्या घटनेनंतर तातडीने पत्नी करिना कपूरने (Kareena Kapoor) एका आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला होता. मात्र संबंधित आयपीएस अधिकाऱ्याने फोन उचलला नाही. आयपीएस अधिकाऱ्याकडून कोणताच प्रतिसाद नसल्याने करिनाने रुग्णालयात धाव घेतली.
नेमकं काय घडलं?
आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामकडून सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यानंतर सैफ अली खानवर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर आरोपी मोहम्मद तेथून पळ काढण्यात यश आले. यानंतर करिनाने मध्यरात्री तात्काळ एका आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला. मात्र आयपीएल अधिकाऱ्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कोणतीच वाट न बघता करिनाने सैफला रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. रुग्णालायत सैफ अली खानला दाखल केल्यानंतर पोलिसांना संबंधित घटनेची माहिती मिळाली. परंतु करिनाने 100 या पोलीस नियंत्रणाशी संपर्क साधला असता तर नाकाबंदी करुन आरोपीला त्याचदिवशी पकडता आले असते, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
आरोपीने पश्चिम बंगालचे सिमकार्ड वापरल्याचे समोर-
आरोपीने मोहम्मदने सिमकार्ड खरेदी करण्यासाठी पश्चिम बंगालचे सिमकार्ड वापरल्याचे समोर आले आहे. आरोपीने बांगलादेशमधून येऊन काही काळ पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य केले होते. तिथून आधारकार्ड बनवून घेतल्यानंतर त्याने सिमकार्ड खरेदी केले आणि त्यानंतर तो मुंबईला आला. आरोपी मोहम्मदने खुखुमोनी जहांगीर शेख या नावाने सिमकार्ड घेतले होते. तसेच मुंबईतल्या अमित पांडे नावाच्या इसमाने त्याला इथे कंत्राटी पद्धतीने काम मिळवून देण्यात मदत केली असल्याचेही समोर आले आहे. आरोपीने पहिल्यांदा चौकशीत तो कोलकाताचा रहिवाशी असल्याचे सांगितले होते.पोलिसांनी कॉल रेकॉर्ड तपासले असता त्याने बऱ्याच बांगलादेशी नंबरवर कॉल केले असल्याचे समोर आले होते.पोलिसानी आरोपीच्या भावाशी संपर्क करून आरोपीची कागदपत्रे मागवली असता कागदपत्रांनुसार तो बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. हल्ल्यानंतर आरोपी सैफ अली खानच्या घरातून निघाला आणि तिथल्याच एका गार्डनमध्ये तो झोपला होता असेही समोर आले आहे.