मुंबई: अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan Attack) घरी घुसलेल्या आणि त्याच्यावर चाकू हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला ठाण्यातून अटक केली आहे. ठाण्यातील कासारवडवली भागातून मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास ही अटक करण्यात आली आहे. आरोपी विजय दासला ठाण्याच्या लेबर कॅम्पजवळून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथील टीसीएस कॉल सेंटरच्या मागे मेट्रो कन्स्ट्रक्शन साईटजवळ हे लेबर कॅम्प आहे, त्या ठिकाणाहून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.


आरोपीला कसा पकडला?


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना मिळालेल्या मोबाईल नंबरच्या आधारे, आरोपी ठाण्यातील एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांची एक टीम कासारवडवली येथील पोलिस स्टेशनमध्ये पोहचली आणि आरोपी ज्या व्यक्तीच्या संपर्कात होता, त्या व्यक्तीला शोधण्यास मदत घेतली. ठाणे पोलिसांनी तातडीने ब्राम्हण सोसायटी जवळील अभिषेक हेगडे या 19 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. अभिषेक आणि आरोपी यांच्यामध्ये गेले काही दिवस फोन वरून संपर्क होता, त्याच आधारे अभिषेकची चौकशी केली असता त्याने कासारवडवली येथील लेबर कॅम्पचे लोकेशन दिले. सोबत मोबाईल टॉवरचे लोकेशन देखील याच ठिकाणचे दाखवले होते. त्यामुळे ठाणे पोलीस आणि मुंबई पोलिसांनी मिळून रात्री उशिरा या परिसरात कोंबिंग ऑपरेशन केले, ज्यामध्ये हा आरोपी सापडला.


एका हाॅटेलमध्ये करत होता आधी काम


सैफ अली खान हल्ला प्रकरणातील (Saif Ali Khan Attack) आरोपी मोहम्मद शरीफउल इस्लाम शहजाद (वय 30) हा दादरहून वरळीला गेला होता. वरळीतील एका हाॅटेलमध्ये ज्या ठिकाणी तो यापूर्वी कामाला होता, त्या ठिकाणी सकाळी त्याने नाष्टा केला, तिथे त्याने जीपे ने पैसे दिले. तिथून पून्हा आरोपी मोहम्मद शरीफउल इस्लाम शहजाद हा दादरला आला, दादरहून ठाण्याला गेल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. ठाण्यातील एका हाॅटेलमध्ये तो काम करत होता. याच हाॅटेलमध्ये चांगलं काम केल्याचा पार्श्वभूमीवर त्याचे कौतुकही केले होते. पांडे नावाच्या व्यक्तीने त्याला कामावर ठेवल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या मुकादम पांडेलाही ताब्यात घेतले आहे. त्याचाही जबाब या प्रकरणात पोलिस नोंदवणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. 



बांगलादेशी असल्याचा संशय, पोलिसांची माहिती


मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद असे या आरोपीचे नाव आहे, या आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाईल. पोलिस कस्टडीची मागणी केली जाईल. हा आरोपी बांगलादेशी असल्याचा आम्हाला संशय असून त्या अनुशंगाने आम्ही गुन्ह्यांच्या कलमात वाढ केली आहे, त्याची चौकशी केली जाईल. हा आरोपी बांगलादेशी आहे, भारतात तो अवैध रित्या राहत असल्याची माहिती आहे. भारतात आल्यानंतर त्याने स्वत:चं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद हे नाव बदलल त्याने स्वताचं नाव विजय दास ठेवलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.