Sachin Pilgaonkar : सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ), महेश कोठारे (Mahesh Kothare), अशोक सराफ (Ashok Saraf) आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्या सिनेमांनी मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. सचिन पिळगांवकर, अशोक सराफ आणि लक्ष्या त्याप्रमाणे महेश कोठारे, अशोक सराफ आणि लक्ष्या या दोन्ही त्रिकुटांनी मिळून प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं आहे. त्यामुळे त्यांचे सिनेमे आजही प्रेक्षकांच्या तितकेच आवडीचे आहेत. जशी यांच्या सिनेमांची चर्चा होते, त्याचप्रमाणे त्यांचे मैत्रीचे किस्सेही तितकेच चर्चेचा विषय असतात.
सचिन पिळगांवकर यांनी नुकतीच माझा कट्टाला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी महेश कोठारे, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे महेश कोठारे यांचा कोणता सिनेमा जास्त आवडतो यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. नवरा माझा नवसाचा या सिनेमाच्या निमित्ताने सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांनी माझा कट्टावर हजेरी लावली होती.
मी महेशसोबत कधी काम केलं नाहीये... - सचिन पिळगांवकर
तुम्ही इतक्या दिग्गजांसोबत काम केलं, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्याकडून तुम्ही काय असं वेचलं आहे की ज्याचा फायदा तुम्हाला आतापर्यंत होतोय... यावर उत्तर देताना सचिन पिळगांवकर यांनी म्हटलं की, महेश कोठारेसोबत मी काम नाही केलं. समवयस्कात काम केलं, याचा अर्थ तुम्ही त्यांच्याकडून काही टीपता असं होत नाही. पण तुम्ही त्यांची काम बघून प्रशंसा नक्की करु शकता. मला महेशचे सिनेमे पाहायला खूप आवडतं. त्याचा थरथराट हा माझ्यामते नंबर वन सिनेमा आहे.पण सिनेमा बनवण्याची त्याची पद्धतच वेगळी आहे आणि माझी पद्धत वेगळी आहे.
पुढे त्यांनी म्हटलं की, 'अशोक सराफकडून काही शिकण्यासारखं असेल तर शिस्त, जी गोष्ट मी त्याची टिपली. जे तुम्ही सरावादरम्यान केलं नाही, ते तुम्ही टेकमध्ये नाही करायचं. भरपूर कलावंताना ही सवय असते की, टेकमध्ये स्वत:चं काहीतरी करतात. याबाबतीत त्याचं म्हणणं मला पटलं आणि ते पटतं.. तुम्हाला जर काही करायचं असेल तर समोरच्या अॅक्टरला सांगून करा. त्याच्या शिस्तीमध्ये बऱ्याच गोष्टी आल्या.. ही गोष्ट आली, वेळेवर पोहचणं आलं, आधी संवाद पाठ करणं आलं, हे सगळंच आलं त्यामध्ये. लक्ष्याकडून कोणती चांगली गोष्ट शिकलो असेल तर बडे दिलवाला आदमी...ती एक गोष्ट मला त्याच्याकडून शिकायला मिळाली. तो दिलदार होता...'