Sachin Pilgaonkar-Ashok Saraf : सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) आणि अशोक सराफ (Ashok Saraf) ही संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. त्यांचे अनेक सिनेमे आजही प्रेक्षकांच्या पंसतीस उतरतात. अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा, नवरी मिळे नवऱ्याला ते नवरा माझा नवसाचा या सिनेमांपर्यंत या जोडीने प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं. त्यातच आता त्यांच्या नवरा माझा नवसाचा या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचदरम्यान अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांचा एक व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आलाय.
नुकतीच सिद्धिविनायकचं दर्शन घेऊन नवरा माझा नवासाचा सिनेमाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांनी दादरमधील प्रसिद्ध अशोक वडापावचा आनंद घेतला. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ बराच चर्चेत आलाय. तसेच या दोघांनीही एकत्र वडापाव खाण्याचा आस्वाद घेतला.
सचिन पिळगांवकरांनी शेअर केला व्हिडीओ
सचिन पिळगांवकरांनी त्यांच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये सचिन पिळगांवकर यांनी म्हटलं की, बाप्पाचं दर्शन, पाऊस आणि वडापाव... बाजूला अशोक आणि हातात अशोकचा वडापाव... हा बडा भाव आणि हा वडापाव. यावर अनेकांनी कमेंट्स केल्याचं पाहायला मिळत आहे.
19 वर्षांनी येणार सिनेमाचा सिक्वेल
सचिन पिळगावकर दिग्दर्शित "नवरा माझा नवसाचा" या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल 19 वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. येत्या 20 सप्टेंबर रोजी या सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. एस टी बस प्रवासात "नवरा माझा नवसाचा" चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता "नवरा माझा नवसाचा 2" चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे.
अशोक सराफ टीसीच्या भूमिकेत
सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे तर संवाद संतोष पवार यांचे आहेत.चित्रपटाच्या रिलीज डेटचा एक टीजर देखील सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याशिवाय "नवरा माझा नवसाचा चित्रपटात बस कंडक्टर असलेले अशोक सराफ आता "नवरा माझा नवसाचा 2"मध्ये तिकीट चेकर अर्थात टीसी झाले आहेत.