Pradhan Mantri Mudra Yojana : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी काल अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. सरकारनं मुद्रा कर्जाची (Mudra Loan) मर्यादा दुप्पट केली आहे. आता या योजनेअंतर्गत 20 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज घेता येणार आहे. मात्र, या योजनेचा लाभ कोणाला मिळतो? त्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.


युवकांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) चालवली जाते. या योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज दिले जात होते. परंतू, अर्थसंकल्पात सरकारनं ही मर्यादा दुप्पट केली. आता या योजनेंतर्गत 20 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज मिळणार आहे. मोदी सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली. या योजनेत बिगर कॉर्पोरेट आणि बिगर कृषी कारणांसाठी कर्ज दिले जाते. जे युवक बेरोजगार आहेत आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा ज्यांना व्यवसाय वाढवायचा आहे परंतु त्यांच्याकडे निधी नाही किंवा कमी आहे, अशा व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.


कर्ज 3 श्रेणींमध्ये उपलब्ध 


या योजनेंतर्गत, सध्या 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 3 श्रेणींमध्ये दिले जाते 
शिशू कर्ज - यामध्ये 50 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.
किशोर कर्ज - यामध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
तरुण कर्ज- यामध्ये 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम कर्ज म्हणून दिली जाते.
कर्ज घेण्यासाठी या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे


मुद्रा योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला प्रथम व्यवसाय योजना तयार करावी लागेल. तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे बँकेला द्यावी लागतील. बँक तुम्हाला बिझनेस प्लॅन, प्रोजेक्ट रिपोर्ट आणि इतर महत्वाची कागदपत्रे विचारेल. ती बँकेला सादर करावी लागतील.


योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी काय? 


कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती भारताची नागरिक असणे आवश्यक आहे.
अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा कोणताही बँक डिफॉल्ट इतिहास नसावा.
कोणताही व्यवसाय ज्यासाठी मुद्रा कर्ज घ्यायचे आहे ती कॉर्पोरेट संस्था नसावी.
कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.


या योजनेचे फायदे काय?


कर्ज तारणमुक्त आहे आणि त्यावर कोणतेही प्रक्रिया शुल्क नाही.
या योजनेअंतर्गत उपलब्ध कर्जाचा एकूण परतफेड कालावधी 12 महिने ते 5 वर्षांपर्यंत आहे. पण जर तुम्ही 5 वर्षात परतफेड करू शकत नसाल तर तुमचा कार्यकाळ आणखी 5 वर्षांनी वाढवला जाऊ शकतो.
या कर्जाची चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला मंजूर केलेल्या कर्जाच्या संपूर्ण रकमेवर व्याज द्यावे लागत नाही. तुम्ही मुद्रा कार्डद्वारे काढलेल्या आणि खर्च केलेल्या रकमेवरच व्याज आकारले जाते.
तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असलात तरी मुद्रा योजनेद्वारे कर्ज घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला तीन श्रेणींमध्ये कर्ज मिळते. व्याजदर श्रेणीनुसार बदलतात.


कसा कराल अर्ज?


सर्वप्रथम मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइट mudra.org.in वर जा.
मुख्यपृष्ठ उघडेल ज्यावर तीन प्रकारचे कर्ज - शिशु, किशोर आणि तरुण दिसतील, तुमच्या आवडीनुसार श्रेणी निवडा.
एक नवीन पृष्ठ उघडेल, तुम्हाला येथून अर्ज डाउनलोड करावा लागेल आणि या अर्जाची प्रिंट काढावी लागेल.
अर्ज योग्यरित्या भरा, फॉर्ममध्ये काही कागदपत्रांच्या छायाप्रती विचारल्या जातील जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, कायमस्वरूपी आणि व्यावसायिक पत्त्याचा पुरावा, आयकर रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्नची प्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो इ.
हा अर्ज तुमच्या जवळच्या बँकेत सबमिट करा. बँक तुमच्या अर्जाची पडताळणी करेल आणि कर्ज 1 महिन्याच्या आत दिले जाईल.


महत्वाच्या बातम्या:


ना कर्जमाफी, ना धोरणात्मक निर्णय, शेतकरी कर्जाच्या ओझ्याखालीच, अर्थसंकल्पावर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा हल्लाबोल