चेन्नई : प्रख्यात तेलुगु, तामिळ, हिंदी गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांना चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना आधी श्वासोच्छ्वास करायला त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांची कोव्हिड चाचणी केल्यानंतर ती पॉझिटीव्ह आली. कालांतराने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Continues below advertisement


रुग्णालयात गेल्यानंतर त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला. गेले अनेक दिवस ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत चढउतार होत आहेतच. पण आता मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. ही बातमी कळताच प्रख्यात अभिनेते कमल हासन यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन एसपी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संगीतसृष्टीतले अनेक मान्यवर ते यातून बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करत आहेत.


एसपी बालसुब्रमण्यम यांच्याबद्दल..
एसपी बालसुब्रमण्यम हे नाव माहीत नाही असा संगीतप्रेमी भारतात सापडणार नाही. संपूर्ण भारताला त्यांची ओळख झाली ती 90 च्या दशकात. जेव्हा सलमान खानचा आवाज म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. सलमान खानचे मैने प्यार किया, पत्थर के फूल, हम आपके है कौन, रोजा आदी अनेक हिंदी चित्रपटांसाठी गायन केलं आहे. पण त्याही आधी एक दुजे के लिये या गाजलेल्या चित्रपटातली त्यांची गाणी विशेष गाजली. एसपी यांनी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम केलं आहे.


सुरांवरची पकड आणि स्पष्ट शब्दोच्चार यांमुळे त्यांचा आवाज अनेकांच्या ह्रदयात कोरला गेला आहे. तेलुगु, तामीळ, कन्नड, मल्याळम, हिंदी अशी तब्बल 40 हजार गाणी गाण्याचा गिनीज विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. केवळ संख्या म्हणून नव्हे, तर एका दिवसांत सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे. त्यांनी सकाळी 9 ते रात्री 9 या 12 तासांत तब्बल 21 गाणी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा प्रकारे हिंदीत त्यांनी 16 गाणी रेकॉर्ड केली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आलं आहे.


एसपी यांना अभिनयाचीही उत्तम जाण होती. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. यात भारताला त्याची ओळख पटली ती हमसे है मुकाबला या सिनेमातून. यात त्यांनी प्रभूदेवाच्या भावाची भूमिका केली आहे. अत्यंत नम्र, मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सर्व स्तरातून प्रार्थना होत आहेत.