Rubaab Upcoming Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Industry) नव्या विषयांसोबतच नवे, ताकदीचे दिग्दर्शकही आपला ठसा उमटवत आहेत आणि आता या यादीत शेखर बापू रणखांबे यांचं नाव जोडलं जात आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित 'रुबाब' (Rubaab Marathi Cinema) या चित्रपटाची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. चित्रपटाच्या धडाकेबाज टीझरनंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे प्रेक्षकांसाठी रुबाबदार लव्हस्टोरी (Hatke Lovestory) घेऊन येत आहेत. हा त्यांचा पहिला चित्रपट असून टीझरलाच प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
मुंबईत संघर्षाची वाट चालत शेखर बापू रणखांबे यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी प्लंबिंगसारखी कामे केली. त्यानंतर त्यांचे रंगभूमीशी नाते जुळले आणि नाटकांच्या बॅकस्टेजवर काम करताना कथाकथनाची, अभिनयाची आणि दिग्दर्शनाची शिस्त त्यांनी जवळून अनुभवली. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शन आणि लेखनाकडे कल वळवला. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करून अनुभव मिळवला आणि 'रेखा', 'पॅम्पलेट'सारख्या शॉर्ट फिल्म्स केल्या. पॅम्पलेट या शॉर्ट फिल्मची निवड 'इंटरनॅशन फिल्म फेस्टिवल'मध्ये इंडियन पॅनोरमा सेक्शन या विभागात झाली. तसेच 'इंटरनॅशन डॉक्युमेंट्री आणि शॉर्ट फिल्म फेस्टिवल ऑफ केरला'मध्ये या शॉर्ट फिल्मला पुरस्कार मिळाला. त्यांच्या 'रेखा' या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली होती. याही शॉर्ट फिल्मची निवड 'इंटरनॅशन फिल्म फेस्टिवल'च्या इंडियन पॅनोरमा सेक्शन विभागात झाली होती.
शेखर बापू रणखांबे यांची इच्छा चित्रपट करण्याची होती आणि 'रुबाब'च्या निमित्तानं ही कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. गावाकडची प्रेमकहाणी हा विषय परिचित असला तरी, 'रुबाब'ची मांडणी व दृष्टिकोन अगदी वेगळा आहे. या चित्रपटाची कथा केवळ प्रेमाभोवती फिरणारी नसून, प्रेम जपताना असलेला स्वाभिमान, ठामपणा आणि आत्मविश्वास यावर भर देणारी आहे.
दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, "रुबाब' हा चित्रपट माझ्या जवळचा आहे. कारण, हा माझा पहिला चित्रपट आहे. मी झी स्टुडियोज व निर्माते संजय झणकर यांचे मनापासून आभार मानतो त्यांच्यामुळे मला योग्य दिशा आणि व्यासपीठ मिळाले. तसेच चित्रपटातील कलाकारांनीदेखील उत्तम कामगिरी करून या कथेला न्याय दिला आहे. 'रुबाब' ही केवळ लव्हस्टोरी नसून त्यात एक वेगळेपणा आहे. टीझरला मिळणार प्रतिसाद बघून आनंद होतो. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल याची मला खात्री आहे..."
संभाजी ससाणे आणि शीतल पाटील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित 'रुबाब' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर निर्माते आहेत तर उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटात संभाजी ससाणे व शितल पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. येत्या 6 फेब्रुवारीपासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
पाहा टीझर : 'रुबाब' मराठी सिनेमाचा टीझर