Ritiesh Deshmukh : भावासाठी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Elections) प्रचारात उतरत रितेश देशमुखने (Ritiesh Deshmukh) लातूरच्या मैदानात धडाकेबाज भाषण केलं. गुलीगत धोका, बुक्कीत टेंगुळ अशा सगळ्या डायलॉगमुळे रितेशच्या भाषणाने वातावरणच बदलून टाकलं. धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांच्यासाठी केलेल्या या भाषणाचा आता लातूरकरांवर कोणता परिणाम होणार हे येत्या 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईलच. पण धीरज देशमुख यांच्या या सभेला आणि रितेश देशमुखच्या भाषणाला तुफान प्रतिसाद मिळाला. याच सभेत गर्दीतून एका आजोबांनी उठून रितेशला हाताचा पंजा दाखवला.
रितेश देशमुखने त्याच्या भाषणात बोलताना राज्यात सरकार महाविकास आघाडीचच येणार हे अगदी ठणकावून सांगितलं. त्याचवेळी गर्दातून उठून एका आजोबांनी रितेशशी संवाद साधला. त्यांच्या बोलण्यावर रितेशसह संपूर्ण गर्दीने एकच जल्लोष केला. रितेश देशमुखनेही आजोबांना बोलताना म्हटलं की, ओ अण्णा दिसताय तुम्ही मला. तुमचा पंजा भारीये...तुमचा पंजा भारी,माझा पंजा भारी सगळ्यांचा पंजा लय भारी...
धर्माचं आम्ही बघून घेतो - रितेश देशमुख
रितेश देशमुख यांनी या भाषणातून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. त्याने म्हटलं की, "जो पक्ष तुम्हाला धर्म बचाव म्हणतो. धर्म धोक्यात आहे म्हणतो. खरं म्हणजे ते धर्माला प्रार्थना करत आहेत, आमचा पक्ष धोक्यात आहे. तुम्ही आम्हाला वाचवा. यांच्या भूल थापांना बळी पडण्याची गरज नाही. त्यांना म्हणा, धर्माचं आम्ही बघून घेतो. आमच्या कामाचं सांगा. धर्माचं आम्ही बघून घेतो, तुम्ही पिकाचा भाव सांगा. धर्माचा आम्ही बघून घेतो, तुम्ही आमच्या आया-बहिणी सुरक्षित आहेत का? ते सांगा"
यावेळी एकदम झापूकझुपूक वातावरण आहे - रितेश देशमुख
यावेळी एकदम झापूकझूपूक वातावरण आहे. समोर गुलिगत धोका आहे... पण विकास कामाचं एकच नाव आहे तिकडे अमित भैय्या आणि इकडे धीरज.. ते तुमच्यासाठी काम करत आहेत. अमित देशमुख एक नंबर...धीरज देशमुख एक नंबर... ज्या व्यक्तीला लहानपणापासून मी धीरज म्हणायचो, तुमच्यामुळे धीरज भैय्या म्हणावं लागतंय. कालच्या महिला मेळाव्यात विजय निश्चितच झाला होता.आजची सभा ही लीड आहे. विरोधी पक्ष नेहमीच तुम्ही त्यांच्याकडे जावे म्हणून येतात.