Resham Tipnis Social Media Post: दोन दिवसांपूर्वी गुजराती टेलिव्हिजन विश्वातील एका अभिनेत्रीच्या 14 वर्षांच्या मुलानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आलेली. या बातमीनं कांदिवलीसह संपूर्ण शहर हादरुन गेलं. अभिनेत्रीनं मुलाला ट्यूशनला जाण्याचा तगादा लावला होता, मुलाला ट्यूशनला जायचं नव्हतं, त्यामुळे रागाच्या भरात मुलानं 57व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर एका वेब पोर्टलनं या बातमीसाठी रेशम टिपणीस आणि तिचा मुलगा मानव टिपणीसचा फोटो वापरला. त्यानंतर मात्र सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली. ज्या अभिनेत्रीच्या मुलानं आत्महत्या केली, ती अभिनेत्री रेशम टिपणीस असल्याच्या चर्चा रंगल्या. अशातच यासंदर्भात एक पोस्ट करत मराठी अभिनेत्री रेशम टिपणीसनं संताप व्यक्त केलाय. तसेच, माझा मुलगा मानव ठणठणीत असल्याचंही रेशमनं या पोस्टमधून सांगितलं आहे.
मराठी मनोरंजनसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीसचा (Actress Resham Tipnis) मुलगा मानव टिपणीसनं आत्महत्या केल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ही बातमी पाहिल्यावर रेशम टिपणीस संतापली आणि तिनं तात्काळ सोशल मीडियावर पोस्ट केली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन रेशमनं संताप व्यक्त केलाच. पण त्यासोबतच रेशमनं तिचा मुलगा मानव अगदी ठणठणीत असल्याचं सांगितलं. तसेच, हे कृत्य करणाऱ्यांविरोधात तिनं कठोर कारवाई करणार असल्याचंही म्हणाली.
सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये काय म्हणाली रेशम टिपणीस?
अभिनेत्री रेशम टिपणीस पोस्टमध्ये म्हणाली की, "कृपया खोटी बातमी पसरवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. बाप्पाच्या कृपेनं माझा मुलगा मानव बरा आणि ठणठणीत आहे. पण हे ज्यानं कोणी केलं आहे, त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे." रेशम टिपणीसनं केलेल्या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, रेशमला खोटी बातमी पसरवणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलण्यास सांगितलं आहे.
रेशम टिपणीसनं व्हिडीओ शेअर करत पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओमध्ये रेशम म्हणाली की, "मला हा व्हिडीओ पोस्ट करायचा नव्हता पण मला खूप फोन आहेत त्यामुळे मी हा व्हिडीओ शूट करतेय. काल एक न्यूज आलेली माझ्या मुलाबद्दल. इन्स्टा आयडी आहे लाफिंग कलर्स म्हणून. त्याच्यावर त्या मूर्ख माणसाने पोस्ट केलेलं की माझ्या मुलाने 57 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आणि त्याचा मृत्यू झाला आहे. या विचित्र लोकांना हे सगळं करण्याची परवानगी कोण देतं हे मला माहिती नाही. लाफिंग कलर्स म्हणून तुम्ही अकाऊंट बनवलंय आणि त्यावर तुम्ही लोकांच्या फेक बातम्या पसरवता, सोशल मीडियावर काही जोक करता. पण हा जोक नाहीये. तुम्ही एखाद्याच्या इमोशन्सशी खेळताय. विचार करा एका आईवर त्याचे काय परिणाम होऊ शकतात. मला जेव्हा फोन आला तेव्हा मी थरथरले. पण अर्धा तास आधीच मी त्याच्याशी बोलले होते. मला माहिती होतं पण तरीही मी त्याला फोन केला की तू कुठे आहे. तो कामावर होतो."
"मी सायबर क्राइममध्ये तक्रार दाखल करण्याचा विचार करतेय. तुमची ओळख कोणाकडे असेल तर प्लिज यावर कठोर कारवाई करण्यासाठी मदत करा. कारण आता झालंय असं की असंही सोशल मीडियावरून लोकांना विश्वास उडाला आहे. पण जे लोक खरी काम करत आहेत त्यांच्यावरही कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे हे सगळं गांभीर्याने घेण्याची गरज आहे. या लोकांना थांबवलं पाहिजे आणि शिक्षा द्यायला पाहिजे.", असं रेशम टिपणीस म्हणालीय.
रेशम टिपणीस आणि संजीव सेठ यांचा मुलगा मानव टिपणीस
अभिनेत्री रेशम टिपणीस आणि संजीव सेठ यांनी 2004 मध्ये घटस्फोट घेतलेला. 11 वर्षांच्या सुखी संसारात त्यांना दोन मुलं झाली. पण, त्यानंतर दोघांच्या आयुष्यात मिठाचा खडा पडला. रेशमला संजीव सेठ यांच्या एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेअरबाबत कळालं. त्यावेळी रेशमनं स्वतः नवऱ्याला घटस्फोट दिला आणि त्याचं दुसरं लग्न लावून दिलं. एवढंच नाहीतर रेशमनं नवऱ्याला दुसऱ्या लग्नाच्या तयारीसाठीही मदत केली. मानव टिपणीस हा रेशम टिपणीस आणि संजीव सेठ यांचा मुलगा. काही दिवसांपूर्वी संजीव सेठ यांचा दुसरा घटस्फोट झाला.