Rasika Vengurlekar On Trolling All Eyes On Rafah :  सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी 'All Eyes on Rafah' (ऑल आईज ऑन रफाह) हा ट्रेंड सुरू होता. पॅलेस्टाईन आणि इस्त्राएल दरम्यानच्या सीमा भागात युद्धग्रस्त निर्वासितांसाठी असलेल्या शिबिरावर इस्राएलने बॉम्ब हल्ला केला. त्यानंतर 'All Eyes on Rafah' (ऑल आईज ऑन रफाह)  हा इस्राएलच्या कारवाईच्या विरोधात ट्रेंड सुरू झाला होता. आता, या ट्रेंडमध्ये अनेक कलाकारांनी सहभाग नोंदवला होता. यात मराठी कलाकारांनीदेखील सहभाग घेतला. यावरून कलाकारांना ट्रोलही करण्यात आले. या ट्रोलिंगला आता उत्तरही देण्यात आले. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर (Rasika Vengurlekar) हिनेदेखील पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले  आहे. 


'All Eyes on Rafah' (ऑल आईज ऑन रफाह) वरून विशिष्ट विचारांशी बांधिलकी असणाऱ्यांनी कलाकारांचे ट्रोलिंगही सुरू केले. अनेकांनी पाकिस्तान, बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधात सुरू असलेल्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला. तर, काहींनी काश्मिरी पंडितांच्या निर्वासिताची मुद्दा उपस्थित केला होता. मराठीमधील अभिनेता सौरभ गोखले याने देखील आक्षेप घेत त्याचसंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. त्याने म्हटलं की, स्वत:च्या घरी कामाला येणाऱ्या बाईंचं पोर शाळेत जाऊ शकतं कि नाही हे आम्हाला माहित नाही, पण आमचं स्टेटस 'All Eyes on Rafah', अशी तिरकल टिप्पणी केली. 


कलाकारांची ही भूमिका एकतर्फी असल्याचं अनेकांचं म्हणणं होते. त्यातच इस्रायलच्या दुतावासाने केलेल्या पोस्टमध्येही कलाकार एकतर्फी भूमिका घेत असल्याचे म्हटले. त्यातच भारताशी याचा संबंध जोडत काश्मीरी पंडिताचा उल्लेख नेटकऱ्यांकडून करण्यात आला. काश्मीरमध्ये जेव्हा काश्मीरी पंडितांविरोधात हिंसा उफळली होती, तेव्हा कलाकार मंडळी कुठे होती, असाही प्रश्न नेटकऱ्यांनी केला. त्याचप्रमाणे कलाकारांनी कोणतीही भूमिका घेण्यापूर्वी त्याची कल्पना असावी असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 


ट्रोलर्सला प्रत्युत्तर देणारी पोस्ट


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर हिनेदेखील 'All Eyes on Rafah' ची पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर तिने आक्षेप घेणाऱ्यांना प्रत्युत्तर देणारी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने राफाह, सुदान, काश्मिरी पंडित, पाकिस्तानमधील हिंदू, बांगलादेशातील हिंदू यांच्यावरही आमचे लक्ष आहे. जगातील प्रत्येक मृत्यूवर, नरसंहार आणि युद्धावर आमची नजर आहे. पण, प्रत्येक गोष्टीमध्ये धर्म आणण्याचा आजार झाला असल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हटले. मानवता ही गोष्ट प्रत्येक धर्माच्यावर आहे. धर्म आपल्याला मानवता पहिली असल्याचे सांगतो, असेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले. 




रसिकासारखीच पोस्ट अभिनेत्री भाग्यश्री मोटेदेखील शेअर केली होती.