Dhurandhar Movie: रणवीर सिंहची आगामी फिल्म ‘धुरंधर’ (Dhurandhar) डिसेंबरमध्ये बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एंट्रीसाठी सज्ज आहे. मात्र, रिलीजपूर्वीच ही फिल्म कायदेशीर कचाट्यात सापडल्याचं दिसत आहे. शहीद मेजर मोहित शर्मा यांच्या कुटुंबियांनी या चित्रपटाच्या रिलीजला स्थगिती देण्याची मागणी केलीय. दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. मेजर मोहित शर्मा जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. ‘धुरंधर’ची कथा त्यांच्या शहीद मुलाच्या जीवनावर आधारित असूनही चित्रपट निर्मात्यांनी त्यांची परवानगी घेतली नाही. असं कुटुंबीयांचे म्हणणे आहे. दरम्यान, ही फिल्म 5 डिसेंबरला जगभरातील चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

Continues below advertisement

शहीद परिवाराची परवानगी न घेण्याचा आरोप

शहीद मेजर मोहित शर्मा यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की ट्रेलरपासून ते कॅरेक्टर, मिलिटरी पार्श्वभूमी आणि संपूर्ण कथानक त्यांच्या मुलाच्या बलिदानाशी साधर्म्य दाखवते. मेजर मोहित शर्मा वर्ष 2009 मध्ये, वयाच्या 31व्या वर्षी, जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा येथे अंडरकव्हर ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. कुटुंबीयांनी म्हटले आहे की, त्यांची परवानगी न घेता बनवलेला हा चित्रपट त्यांच्या गोपनीयता, प्रतिष्ठा, वैयक्तिक आणि संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन करतो. हे अधिकार संविधानाच्या कलम 21 अंतर्गत येतात. दरम्यान काही दिवसांपूर्वीच आदित्य धर यांनी हा चित्रपट मेजर मोहित शर्मा यांच्यावर आधारित नसल्याचं अधिकृतपणे सांगितलं होतं. 

फिल्मच्या रिलीजवर तात्काळ स्थगितीची मागणी

याचिकेत असा आरोप करण्यात आलाय की चित्रपटात स्पेशल ट्रूपची स्ट्रॅटेजी, अंडरकव्हर मिशनचे पॅटर्न, काउंटर-टेरर तंत्र आणि देशाच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित संवेदनशील बाबी दाखवल्या आहेत, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

या याचिकेत माहिती आणि प्रसारण मंत्रालय, सेना एडीजीपीआय, सेंसर बोर्ड, चित्रपट दिग्दर्शक व निर्माता आदित्य धर आणि प्रॉडक्शन हाउस जिओ स्टुडिओज यांना पक्षकार करण्यात आले आहे. शहीद मेजरांच्या कुटुंबीयांनी कोर्टाकडे फिल्मच्या रिलीजवर तात्काळ स्थगितीची मागणी केली आहे. तसेच, चित्रपटाची प्रायव्हेट स्क्रीनिंग करण्याचीही विनंती केली आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. चित्रपटाची लीड अभिनेत्री 20 वर्षांची सारा अर्जुन आहे.