मुंबई : कलादिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केल्यानंतर मनोरंजनसृष्टीत असलेली युनियन्सची मक्तेदारी उजेडात आली आहे. राजू सापते यांनी व्हिडिओमध्ये राकेश मौर्य यांचं नाव घेतलं आहे. पण त्यांनी लिहिलेल्या पत्रात राकेश यांच्यासह नरेश विश्वकर्मा, गंगेश्वर श्रीवास्तव यांच्या नावाचा उल्लेखही राजू यांनी केला आहे. या तिघांनी त्रास दिल्याचा उल्लेख पत्रात केला आहे. सापते यांची आत्महत्या झाल्यानंतर पाच दिवस उलटूनही अद्याप त्यांनी उल्लेख केलेल्या लोकांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. अपवाद नरेश विश्वकर्मा यांचा. पण आता पोलिसानी यासाठी स्पेशल एक्शन प्लॅन तयार केला आहे. आज मनोरंजसृष्टीच्या समितीसोबत केलेल्या विशेष झूम बैठकीत याची चर्चा झाली व काही निर्णय घेतले गेले.
गुरुवारी सायंकाळी झालेल्या झूम बैठकीमध्ये मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर या भागातले जवळपास 60 वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर होते. शिवाय, मनोरंजनसृष्टीत काम करणारे निर्माते, कलादिग्दर्शक आदी लोक हजर होते. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. याबाबत एबीपी माझाला माहिती देताना या बैठकीला उपस्थित असलेले आदेश बांदेकर म्हणाले, पोलिसांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. अनेक मुद्दे आले. त्यातले महत्वाचे असे, राजू सापते यांच्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी स्पेशल अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यात पुणे पोलीस आणि मुंबई पोलीस एकमेकांच्या सहकार्याने काम करणार आहेत. शिवाय, कोणत्याही युनियन मार्फत खंडणी उकळण्याचे प्रकार होऊ नयेत म्हणून दहा जणांचा एक ग्रुप तयार केला जाणार आहे. त्यात काही पोलीस अधिकारीही असतील. जिथे कुठे काही घटना घडल्या तर तातडीने त्याची माहीती पोलिसांना देता येईल अशी तजवीज केली जाणार आहे.
आदेश बांदेकर बोलताना म्हणाले, यावेळी पोलिसांनीही काही अपेक्षा व्यक्त केल्या. युनियन मार्फत दमदाटी होत असेल वा चित्रिकरण थांबवलं जात असेल, तर तशी तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात करणं गरजेचं आहे. ती तक्रार झाल्यानंतर पोलीस तातडीने त्यावर कारवाई करतील याची ग्वाही पोलिसांनी दिली आहे. मुळात मनोरंजनसृष्टी ही मुंबईची शान आहे. इथे चित्रिकरण करताना कोणालाही अडचण येऊ नये याची जबाबदाारी आमची आहे असं पोलीसांनी सांगितलं. निर्माते, कलादिग्दर्शक आदींनी याचं स्वागत केलं. शिवाय, तक्रार दाखल करण्याचंही आश्वासन दिलं आहे. याशिवाय, मुंबई व परिसरात जिथे स्टुडिओज आहेत, तिथे काम करणाऱ्या निर्माते व इतर लोक आणि तिथलं पोलीस स्टेशनचा एक प्रतिनिधी यांचा ग्रुप करून काहीही अडचण आली तर त्यावर कळवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं.
एकूण राजू सापते याच्या आत्महत्येनंतर मुंबई मनोरंजन क्षेत्रात चालू असलेला धाक आणि दडपशाही रोखण्यासाठी मुंबई आणि उपनगरातले पोलीस आता सज्ज झाले आहे. या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांनीच पोलिसांच्या या सूचनांना पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. आता प्रतीक्षा आहे, ती राजू सापते यांच्या गुन्हेगारांना पकडण्याची. या गुन्हेगारांना आपण लवकरच पकडू असंही पोलिसांनी यावेळी सांगितलं अशी माहीतीही निर्माते, अभिनेते आणि सिद्धीविनयाक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितलं.