नवी दिल्ली : रजनीकांत उर्फ थलैवा...जिवंतपणीच दंतकथा बनण्याचं भाग्य फार कमी लोकांना मिळतं. त्यापैकी एक म्हणजे हा दाक्षिणात्य सुपरस्टार. तामिळी चित्रपटसृष्टी आणि राजकारण यांचं एक घनिष्ठ नातं आहे. रजनीकांतही त्याच परंपरेचा भाग बनणार का याची उत्सुकता होती. मात्र आपण राजकीय पक्ष काढणार नसल्याची एक महत्वपूर्ण घोषणा त्यांनी केली आहे.
नाऊ ऑर नेव्हर...3 डिसेंबरला हाच नारा देत रजनीकांत यांनी आपल्या राजकारणातल्या एन्ट्रीचं सूतोवाच केलं होतं. त्यासाठी तारीखही ठरली होती. 31 डिसेंबर...तामिळनाडूमध्ये अवघ्या चार पाच महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीचं गणितच या घोषणेनं बदललं असतं. पण दरम्यानच्या काळात अशा काही घटना घडल्या की रजनीकांत यांनी नाऊ ऑर नेव्हरमधल्या नेव्हरवरच ठाम राहायचं ठरवलं आहे. राजकीय पक्ष काढणार नसल्याचं त्यांनी एका पत्राद्वारे जाहीर केलंय.
रजनीकांत यांच्या नव्या राजकीय पक्षाच्या लॉचिंगची तयारी एकीकडे सुरु होती. त्याच दरम्यान 25 डिसेंबरला अचानक त्यांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्यानं चेन्नईतल्या एका हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आलं. दोन दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्याचवेळी एक आठवडा पूर्ण विश्रांती करण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला. त्यामुळे नव्या पक्षाचं लॉचिंग पुढे ढकललं जाणार की याची चर्चा होती. मात्र आज अचानक आपण हा निर्णयच मागे घेतल्याची घोषणा रजनीकांत यांनी केली.
तीन पानांचं हे पत्र तामिळी भाषेत आहे. त्यात त्यांनी आपल्या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली आहे. राजकीय पक्षाचा निर्णय मागे घेताना काय रजनीकांत म्हणाले, मला माहिती आहे या निर्णयामुळे माझे अनेक चाहते निराश होतील. पण हा निर्णय घेताना मला किती वेदना होतायत हे फक्त मीच समजू शकतो. माझं आजारपण हे देवानं मला याबाबतीत दिलेली एक वॉर्निंग आहे असं मी मानतो. पक्ष काढल्यानंतर मी केवळ मीडिया, सोशल माध्यमांतून प्रचार करत राहिलो तर त्यामुळे मला हवी असलेली राजकीय उन्नती निर्माण करु शकणार नाही. राजकीय अनुभव असलेला कुणीही व्यक्ती हे वास्तव नाकारु शकणार नाही.
तामिळनाडूमध्ये एप्रिल- मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. सध्या सत्तेत असलेल्या एआयडीएमके या पक्षाला आपली सत्ता टिकवता येईल का याबद्दल अनेकांच्या मनात साशंकता आहे. एआयडीएमके हा सध्या भाजपसोबत आहे. काही दिवसांपूर्वी अमित शाह तामिळनाडूच्या दौऱ्यावर असताना रजनीकांत यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच रजनीकांत यांनी आपल्या राजकीय पक्षाच्या स्थापनेबाबत घोषणा केली होती.
तामिळनाडूत एम जी रामचंद्रन असो की जयललिता की करुणानिधी..हे सगळे बडे राजकीय नेते चित्रपट सृ्ष्टीतूनच राजकारणात आलेले आहेत. रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाची तर गेल्या 25 वर्षांपासून सातत्यानं चर्चा सुरु असायची. यावेळी ही गोष्ट अखेर प्रत्यक्षात येणार असं वाटत असतानाच रजनीकांत यांनी राजकारणाला दूरूनच रामराम केला आहे.
जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात जबरदस्त पोकळी आहे. या दोघांविना होणारी आगामी निवडणूक नीरस होणार असं वाटत असतानाच रजनीकांत यांच्या घोषणेनं त्यात प्रचंड रंगत आणली होती. पण आता ते राजकारणात येत नाहीत म्हटल्यावर अनेकांनी सुटकेचा निश्वासही टाकला असेल.