मुंबई: गेल्या काही दिवसांंपासून हिंदी सक्ती विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याचबरोबर ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मोर्चा देखील काढणार होते. मात्र सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. 'पुन्हा असे निर्णय खपवून घेतले जाणार नाही अशी सक्त ताकीद' राज ठाकरेंनी त्यावेळी दिली. या दरम्यान राज ठाकरे यांनी 'ये रे ये रे पैसा 3' या सिनेमाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटला हजेरी लावली. तिथे त्यांनी 'मी तर माझा ट्रेलर कालच दाखवला आहे आता पिक्चर बाकी आहे', असं मिश्कीलपणे म्हटलं. त्याचबरोबर याच इव्हेंटमधील राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते कोणालातरी 'माझ्याकडे डोळे वटारून काय बघतोस', असं म्हणताना दिसत आहे. या व्हिडीओ व्हायरल झाला असून राज ठाकरे नेमकं कोणाला असं बोलले असावेत असा प्रश्न पडला आहे.

ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचीही विशेष उपस्थिती होती. राज ठाकरे यांनी ट्रेलरचे कौतुक करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. “‘ये रे ये रे पैसा’ ब्लॉकबस्टर ठरला होता आणि तिसराही भाग त्याच यशाची पुनरावृत्ती करेल, याची खात्री आहे,” असं म्हणत त्यांनी निर्माते अमेय खोपकर आणि दिग्दर्शक संजय जाधव यांचे विशेष अभिनंदन केले. चित्रपटात सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, उमेश कामत, तेजस्विनी पंडित हे आघाडीचे कलाकार असून, चित्रपटाला विनोद, ड्रामा आणि धमाल यांचा तडका आहे. ‘ये रे ये रे पैसा 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचवली आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे हा ट्रेलर लाँच सोहळा अजूनच लक्षवेधी ठरला.

 'पिक्चर अभी बाकी है' 

नुकताच सरकारने हिंदी सक्तीबाबतचा जीआर रद्द केला असला, तरी राज ठाकरे यांनी स्पष्ट इशारा दिला की, "पुन्हा असे निर्णय खपवून घेतले जाणार नाहीत." त्यांच्या या वक्तव्याने जनतेच्या भावना अधिकच पेटल्या आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, ‘ये रे ये रे पैसा 3’ या आगामी मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात राज ठाकरे यांनी एक सूचक विधान करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ते म्हणाले, “माझा ट्रेलर मी कालच लाँच केला होता, पिक्चर अभी बाकी है.” या वाक्यातून त्यांनी केवळ चित्रपटाचा नव्हे, तर मराठी भाषेसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा संदर्भ दिला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. अनेकांचे म्हणणे आहे की, हा संघर्ष अजून संपलेला नाही आणि यात आणखी टप्पे येणार आहेत, असा स्पष्ट संदेश राज ठाकरे यांनी दिला आहे.