Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतली बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत अभिनेते आनंद इंगळे (Anand Ingle) यांनी घेतली. पण या मुलाखतीमध्ये एक खुलासा करण्यात आला. काही वर्षांपूर्वी आलेल्या 'अगं बाई अरेच्चा' सिनेमातलं सोनाली बेंद्रेचं (Sonalee Bendre) एक गाण तुफान गाजलं होतं. 'छमछम करता हैं' या गाण्याला बरीच पसंती मिळाली होती. याच गाण्याविषयीची एक गोष्ट या मुलाखतीमध्ये उलगडण्यात आली.
राज ठाकरे हे एक व्यंगचित्रकार असून त्यांचं सिनेमाप्रेमही जगविख्यात आहे. राजकारणासोबतच ते कलेला देखील तितकचं प्राधान्य देतात. मराठी सिनेमांविषयी त्यांची तळमळ ही मराठी कलाकारांकडून देखील अनेकदा व्यक्त केली जाते. पण राज ठाकरेंच्या अमेरिकेतील मुलाखतीमध्ये त्यांची अजून एक आवड प्रेक्षकांच्या समोर आली आहे.
राज ठाकरेंनी दिली प्रसिद्ध गाण्याला चाल
राज ठाकरे यांनी 'अगं बाई अरेच्चा' या सिनेमातील सोनाली बेंद्रेच्या 'छमछम करता हैं नशीला बदन' या गाण्याला चाल दिली आहे. याचा खुलासा अमेरिकेतीमधील मुलाखतीमध्ये राज ठाकरेंकडून करण्यात आला आहे. यावेळी आनंद इंगळेंनी म्हटलं की, राज ठाकरेंना संगीताचा नुसता कान नाही, तर अनेकांना माहिती नसेल,पण राज ठाकरे स्वत: उत्तम संगीत देऊ शकतात. इथे सांगायला हरकत नाही, पण त्यांच्या एका मित्राच्या सिनेमातील एक चाल राज ठाकरेंनी गुणगुणून मग त्याच्यावर पुढचं गाण तयार करण्यात आलं. ते गाणं म्हणजे छमछम करता हैं नशीला बदन. त्यावर राज ठाकरेंनी हसत म्हटलं की, पण त्या गाण्याचे शब्द माझे नाहीत. पुढे त्या आनंद इंगळेंनी म्हटलं की, पण या गाण्याची चाल ही राज ठाकरेंची आहे.
राज ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये अनेक मुद्द्यांवर त्यांची परखड मतं मांडलीत. तसेच त्यांनी या मुलाखतीमध्ये लोकसभेचा निकाल, परदेशातील मराठी माणसांनी मराठीसाठी काय करावं अशा मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केलं आहे.