Aditi Dravid Post for Rahul Dravid : टी-20 विश्वचषकावर (T-20 World Cup) नाव कोरल्यानंतर जितकं कौतुक भारतीय संघाचं झालं, तितकचं कौतुक संघाच्या प्रशिक्षकाचं होतंय. राहुल द्रविडने (Rahul Dravid) भारतीय संघाला प्रशिक्षण दिलं होतं. त्यामुळे या हेड कोचचं आणि भारतीय संघाचं जगभरातून कौतुक केलं जातंय. दक्षिण आफ्रिकेवर (South Africa) 7 धावांनी भारताने दणदणीत विजय मिळवला. अनेक मराठी कलाकारांनी देखील भारतीय संघाचं भरभरुन कौतुक केलं. पण या सगळ्यात एका मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत आलीये.
अभिनेत्री अदिती द्रविड ही राहुल द्रविडची पुतणी आहे. त्यानिमित्ताने अदितीने तिच्या काकासाठी खास पोस्ट केली आहे. तसेच यावर अनेकांनी कमेंट्स करत राहुल द्रविडचंही कौतुक केलंय. अदिती ही राहुल द्रविडची पुतणी असल्याचं कळल्यापासून त्यांच्या या नात्याविषयी बरीच उत्सुकता सगळ्यांना कायमच असते.
अदितीची पोस्ट काय?
अदितीने तिच्या काका आणि वडिलांसोबतचा फोटो यावेळी शेअर केला आहे. त्यावर कॅप्शन लिहित तिने म्हटलं की, थँक्यू कोच, तू त्यांना खूप चांगलं प्रशिक्षण दिलंस. एक परिपूर्ण शेवट. तसेच अदितीने टीम इंडियाचा विश्वचषकाची ट्रॉफी हातात घेतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला होता. त्यावर तिने लिहिलं होतं की, फक्त या माणसाठी आणि बेस्ट 11 साठी.
राहुल द्रविडच्या प्रयत्नांना यश
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या निरोपाची ही अप्रतिम भेट ठरली. नोव्हेंबर 2021 रोजी मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भारतीय संघात त्याने मोलाची भूमिका बजावली. अनुभवी खेळाडू आणि युवा खेळाडूंमध्ये ताळमेळ बसवून ड्रेसिंग रुममधील वातावरण हसता ठेवण्याचा राहुल द्रविडने प्रयत्न केला. याच प्रयत्नांना आज यश मिळाले.