मुंबई : पॉर्नोग्राफी रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेला उद्योगपती आणि बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानं आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांनी केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा राज कुंद्रानं या याचिकेतून केला आहे.


प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला सोमवारी अश्लील चित्रपटांना पैसे पुरवण्याच्या आणि ते इंटरनेटवर अपलोड करण्याच्या कटात सामिल असल्याच्या आरोपात मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 292, 293 (अश्लील सामग्रीची विक्री), 420 (फसवणूक) तसेच कलम 67 आणि 67 ए (लैंगिक सामग्रीचे प्रसारण) माहिती तंत्रज्ञान कायदा आणि महिलांशी असभ्य वर्तनाच्या तरतुदींखालील विविध गुन्हे राज कुंद्रावर दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी अटक करण्यात आल्यानंतर राज कुंद्रा यांना दंडाधिकारी न्यायालयानं 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयानं त्यांच्या पोलीस कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ केली आहे. 


त्याविरोधात आता राज कुंद्रानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोणतीही कायदेशीर नोटीस न बजावता आपल्याला अटक करण्यात आल्याचा दावा करत ही अटक कायद्याचं पालन न करता केल्यानं ती पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा आरोप कुंद्रा यांच्या या याचिकेत करण्यात आलेला आहे. आपल्याकडील जप्त करण्यात आलेले साहित्य हे पॉर्नोग्राफीच्या परिभाषेत बसत नसल्याचा दावाही कुंद्रानं या याचिकेतून केला असून मार्च महिन्यातच याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे चौकशीसाठी समन्स पाठवणं पुरेसं होतं, आम्ही सहकार्य करत चौकशीला हजरही झालो होतो. त्यामुळे आता राज कुंद्रा यांच्या अटकेची कोणतीही गरज नसल्याचा दावाही कुंद्रानं आपल्या या याचिकेतून केला आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या :