Raid 2 Box Office Collection Day 8: राज कुमार गुप्ता दिग्दर्शित (Directed By Raj Kumar Gupta) आणि अजय देवगण (Ajay Devgn) अभिनीत 'रेड 2' (Raid 2) बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे आणि चांगली सुरुवात करणारा हा चित्रपट आठवड्याच्या दिवसातही चांगली कमाई करत आहे. महत्त्वाची बाब अशी की, 'रेड 2'नं सर्व नव्यानं प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना मागे टाकलं आहे आणि बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. 'रेड २'नं रिलीजच्या आठव्या दिवशी म्हणजेच, दुसऱ्या गुरुवारी किती कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात...  

'रेड 2'नं आठव्या दिवशी किती कमाई केली?

'रेड 2' चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे आणि आता तो दुसऱ्या आठवड्यात दाखल झाला आहे. हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या चित्रपटात अजय देवगणचं अमय पटनायकच्या भूमिकेसाठी कौतुक केलं जातंय. तसेच, रितेश देशमुखनं भ्रष्ट राजकारणी दादाभाईच्या भूमिकेत छाप पाडण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

'रेड 2' बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. एवढंच नाही तर, हा चित्रपट दररोज अनेक विक्रम आपल्या नावावर करतोय. रिलीजच्या सातव्या दिवशी, 'रेड 2'नं सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाला मागे टाकलं आणि 2025 सालचा चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या सर्वात जर 8 दिवसांत चित्रपटाच्या कमाईबाबत बोलायचं झालं तर, सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, 

  • 'रेड 2'नं 19.25 कोटी रुपयांसह आपलं खातं उघडलं.
  • या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 12 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 18 कोटी रुपये कमावले.
  • 'रेड 2'नं चौथ्या दिवशी 22 कोटी आणि पाचव्या दिवशी 7.5 कोटी रुपये कमावले.
  • चित्रपटानं सहाव्या दिवशी 7 कोटी आणि सातव्या दिवशी 4.75 कोटी रुपये कमावले.
  • आता, सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'रेड 2'नं रिलीजच्या 8 व्या दिवशी 5.15 कोटी रुपये कमावले आहेत.
  • यासह, 'रेड 2' ची 8 दिवसांत एकूण कमाई आता 95.65 कोटी रुपये झाली आहे.

आता 'रेड 2' मोडणार 'सिकंदर'चा विक्रम 

'रेड 2' बॉक्स ऑफिसवर ज्या वेगां कमाई करतोय, ते अत्यंत आश्चर्यकारक आहे. प्रदर्शित झाल्यानंतर एका आठवड्यातच या चित्रपटानं त्याच्या 48 कोटी रुपयांच्या बजेटपेक्षा कितीतरी पट जास्त कमाई केली आहे. तसेच, हा चित्रपट आता भारतात 'सिकंदर'च्या 109 कोटी रुपयांच्या कलेक्शनला मागे टाकण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. 8 दिवसांत त्याने 95 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाच्या कमाईत पुन्हा वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि तो सलमानच्या सिकंदरला मागे टाकण्याची शक्यता आहे. यासह, 'रेड 2' 2025 मधील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनेल.

दरम्यान, राज कुमार गुप्ता दिग्दर्शित 'रेड 2' मध्ये अजय देवगण, रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा अजय देवगणच्या अमय पटनायक या व्यक्तिरेखेच्या 75 व्या छाप्याभोवती फिरते, ज्यामध्ये तो सर्व अडचणींशी लढतो आणि 4200 कोटी रुपयांचा काळा पैसा शोधून काढतो आणि एका भ्रष्ट राजकारणी दादाभाईच्या साम्राज्याचा सामना करतो.