Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचे 6 वे पर्व सध्या तुफान गाजत आहे. दिवसेंदिवस खेळ अधिक रंगत चालला आहे. सीजन सुरू झाल्यापासून घरात वादविवाद भांडण आणि एकमेकांचे पाय खेचण्याचे प्रकार वारंवार होताना दिसले. भांडणं उकरून काढली गेली. दरम्यान बिग बॉसच्या घरातील पहिल्या स्पर्धकाचं एलिमिनेशन झालं आहे. लावणी नृत्यांगना राधा पाटील मुंबईकर हिने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली आहे. रविवारी बिग बॉसच्या घरातील दुसरा भाऊचा धक्का पार पडला. यावेळी राधाने घराचा निरोप घेतला. घरातून बाहेर पडताना राधा रडवेली झाली होती. घरातून बाहेर पडताना राधा पाटीलने लावणी संदर्भात केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
गेल्या दोन आठवडात बिग बॉसच्या घरातील नऊ सदस्य नॉमिनेट झाले होते. यात प्रभू शेळके ,अनुश्री माने, दिव्य शिंदे, सागर कारंडे ,राधा पाटील, रोशन भजनकर, करण सोनावणे, दिपाली सय्यद, रुचिता जामदार यांचा समावेश होता. पहिल्या आठवड्यात कोणताही स्पर्धक घराबाहेर गेला नव्हता त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष होते. बिग बॉसच्या घरात आता तिसरा आठवडा सुरू झाला आहे. प्रत्येक सदस्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार पाहायला मिळत आहे. दरम्यान, राधा पाटीलच्या बाहेर जाण्यामुळे घरातील काही सदस्य नाराज दिसले. मात्र घरातून बाहेर पडता पडता राधाने तिचं भावना बोलून दाखवल्या.
काय म्हणाली राधा पाटील?
रितेश देशमुखने भाऊचा धक्क्यावर रातून बाहेर पडणार्या स्पर्धकाचे नाव म्हणजेच राधा पाटीलचे नाव घेतल्यानंतर तिला रडू आवरले नाही. रितेश भाऊंनी तिला तिच्या भावना विचारल्या. त्यावेळी राधा म्हणाली' मला महाराष्ट्रासमोर सिद्ध करायचं आहे की आमचा शो घाणेरडा नाही. आम्ही लावणी व्यवस्थित करू शकतो आणि यापुढेही व्यवस्थित करू. " ती पुढे म्हणाली,' बिग बॉस सारख्या शो मध्ये घेणं ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती. पण मला नीट खेळता आले नाही. पण मी पुढे जाईन. वेगवेगळ्या माणसांसोबत मी राहू शकेन इतकी मी मॅच्यूअर झालेली नाही. आयुष्यात पहिल्यांदाच मी अशा कोणत्यातरी शोमध्ये गेले होते. असं राधा म्हणाली.
बिग बॉसच्या घरात आल्यानंतर राधा पाटील सुरुवातीला शांत होती. तिच्यात आणि दिपाली सय्यदसोबत लावणी वरून खटके उडाल्याच दिसलं. दिपाली सय्यद म्हणाली होती बार डांसर तुम्ही स्टेजवर घेऊन येता. दिपालीच्या बोलण्याने राधा दुखावल्याच दिसलं. नंतर तिनेही आक्रमक भूमिका घेत मी पण लायकी काढू शकते असं म्हणत दिपाली सय्यदला फटकारल्याचं समोर आलं होतं. राधा पाटील ही लावणी सम्राज्ञी आहे . महाराष्ट्रभर तिच्या लावणीचे कार्यक्रम गाजतात. बिग बॉसच्या घरात घेण्यापूर्वी गौतमी पाटील सोबत असलेला वाद समोर आला होता त्यामुळे राधा पाटील चर्चेत होती.
