Punjabi Singer Baljeet Singh Found Dead: मनोरंजन विश्वातून खळबळ माजवणारं वृत्त समोर येतंय. प्रसिद्ध गायक (Famous Singer) त्याच्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळून आला. प्रसिद्ध पंजाबी गायक (Famous Punjabi Singer) एकटाच राहायचा. गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ शकला नव्हता. 3 सप्टेंबर, गुरुवारच्या सकाळी, घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्यानं शेजाऱ्यांना काहीतरी अघटित घडल्याचा संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी गायकाच्या घरात प्रवेश केला, त्यावेळी अत्यंत धक्कादायक गोष्ट त्यांना दिसली. गायक बलजीत सिंह यांचा मृतदेह पलंगावर अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याच दिवसांपूर्वी गायकाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
मीडिया रिपोर्टनुसार, गायकाचा मृतदेह पलंगावर अर्धवट टेकलेल्या स्थितीत होता आणि त्याचे हात वरच्या दिशेला होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, घराच्या विविध भागांत, विशेषतः खोल्यांमध्ये रक्ताचे डाग आढळून आले. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी सुरुवातीला या प्रकरणाकडे संशयास्पद घटना म्हणून पाहिलं.
घरात रक्ताचे डाग आढळल्यानं संशय बळावला (Punjabi Singer Baljeet Singh Found Dead)
गायकाच्या घरात रक्ताचे डाग आढळल्यानंतर, पोलिसांनी हत्येच्या शक्यतेसह इतरही विविध बाबींचा तपास केला. घटनास्थळावरुन फॉरेन्सिक पथक, श्वानपथक आणि सीआयए (CIA) पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकांनी घर आणि परिसरातील पुरावे गोळा केले, तसेच कुटुंबीय व नातेवाईकांची चौकशी केली.
बलजीतच्या मृत्यूपूर्वी त्याच्या घराच्या परिसरात कोण आलेलं, हे शोधण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजचीही तपासणी करत आहेत. याव्यतिरिक्त, गेल्या काही दिवसांत बलजीत कोणाच्या संपर्कात होता? त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचं कारण समोर (Punjabi Singer Baljeet Singh)
पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचं खरं कारण समोर आलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अहवालात बलजीत सिंह यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे घरात आढळलेलं रक्ताचे डाग आणि घटनेभोवतीची संशयास्पद परिस्थिती यांवरून सुरुवातीला जो दृष्टिकोन तयार झाला होता, त्यात आता बदल झाला आहे. तरीही, पोलिसांचा तपास सुरूच असून अधिकारी घटनास्थळी आढळलेल्या रक्ताच्या डागांसह इतर बाबींचीही पडताळणी करत आहेत.
प्रसिद्ध पंजाबी गायक बलजीत सिंह 35 वर्षांचे होते. ते सुधर येथील धालीवाल भागात एकटेच राहत होते. अनेक दिवस त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तरीही घरात अशी दुर्दैवी घटना घडली असावी, असा कोणालाही संशय आला नाही. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजारी-पाजाऱ्यांनी पोलिसांना त्याबाबत माहिती दिल्यानंतरच ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आणि त्यानंतर तो कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
नशेमुळे गायकाच्या करिअरला लागलेली उतरती कळा
मीडिया रिपोर्टनुसार, अलीकडच्या काळात बलजीत सिंह व्यसनाच्या आहारी गेला होता, ज्याचा त्याच्या कारकिर्दीवरही परिणाम झाला. पंजाबमधील गँगस्टर्सचं उदात्तीकरण करणारी गाणी लिहिल्याचा आरोपही त्याच्यावर झाला होता. मात्र, या गोष्टींचा आणि त्याच्या मृत्यूचा काही थेट संबंध आहे की नाही, हे सांगणं अद्याप घाईचं ठरेल. सध्या पोलिसांचा तपास त्याच्या मृत्यूशी संबंधित परिस्थिती आणि त्याच्या घरात सापडलेले विविध पुरावे यांची सांगड घालण्यावर केंद्रीत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
