Pune Car Accident Ketaki Chitale: पुण्यातील कल्याणीनगर येथे काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास धनिकपुत्राने आपल्या कारच्या धडकेत अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना धडक दिली. या अपघातात दोघांनाही जीव गमवावा लागला होता. त्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. या अपघात प्रकरणातील (Pune Accident) मुख्य आरोपी असलेल्या मुलाला काही तासांत जामीन मिळाला. तर, पोलिसांनी आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला पिझ्झा, बर्गर खाण्यास दिले असल्याचे वृत्त समोर आले होते. या सगळ्या प्रकरणावर अभिनेत्री केतकी चितळेने संताप व्यक्त केला आहे.
केतकी चितळेने पुणे अपघात प्रकरणावर एका व्हिडीओतून आपली भूमिका मांडली आहे. या व्हिडीओत केतकीने पोलिसांवर आपला संताप व्यक्त केला. दोन वर्षापूर्वी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला अटक झाली होती. त्यावेळी पोलिसांनी दिलेली वागणूक आणि या अपघात प्रकरणातील आरोपीला दिलेल्या व्हीआयपी ट्रिटमेंटवर तिने संताप व्यक्त केला.
केतकीने आपल्या व्हिडीओत काय म्हटले?
आपल्यासारखं सामान्य नागरिकांना सोळा-साडे सोळा तास उपाशी ठेवलं जाते. एक किलोमीटर अंतरापर्यंत वडापाव-किंवा भजीपावची गाडीच नाही, त्यामुळे तुझ्यासाठी खायला आणणं शक्य नसल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. तेव्हा सोळा तास मी उपाशी होते आणि आता रात्री तीन वाजता या लाडावलेल्या मुलासाठी पोलिस बर्गर पिझ्झा शोधत होते, असा संताप केतकीने व्यक्त केला.
पोलिसांचा प्लान फसला...
या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मुलाला वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न फसला असल्याचे केतकीने म्हटले. धडक देणारी कार हा अल्पवयीन मुलगा चालवणार नसल्याचे पोलीस सांगणार होते. पण, तिथे असणाऱ्यांनी व्हिडीओ काढले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांचा त्याला वाचवण्याचा प्लान फसला असल्याचे केतकीने म्हटले.