Atishay Nirlajja Kande Pohe : कॉमेडियन समय रैनाचा (Samay Raina) इंडियाज गॉट लेटेन्ट (India's Got Latent) शो सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं दिसून येत आहे. यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) या कार्यक्रमात पालकांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्याला चांगलंच सुनावलं जात आहे, या सर्व वादामुळे त्याचा शो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या कार्यक्रमात वापरलेली भाषा, विषय फारच आक्षेपार्ह, असभ्य आणि अश्लील असून या कार्यक्रमावर बंदी घालावी, अशी मागणी होतेय. काही जण याला विरोध करत आहेत, तर काही समर्थनार्थ बोलत आहेत, अशातच भाडीपा या यूट्यूब चॅनेलने त्यांचा 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे' या कार्यक्रमाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाचा 14 फेब्रुवारी रोजी होणारा शो पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, भाडिपाचा सारंग साठे मनसेच्या निशाण्यावर असल्याचं दिसून येत आहे. 

मनसेचे पुणे शहराध्यक्ष, मनसे चित्रपट सेनेकडून सारंग साठे आणि भाडिपा चॅनलचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे, त्याचबरोबर पुण्यात होणारे पुढील कार्यक्रम आम्ही मनसे स्टाईलने बंद पाडू असा इशारा देखील दिला आहे. मनसे चित्रपट सेनेचे शहराध्यक्ष चेतन अशोक धोत्रे यांनी या कार्यक्रमाबाबत संताप व्यक्त करणारी सोशल मिडियावर पोस्ट लिहून इशारा देखील दिला आहे. भाडीपा चॅनेलकडून अनेकदा स्वतःचा TRP वाढवण्याकरिता आपली संस्कृतीमूल्य, कुटुंबसंस्था यांचं वेळोवेळी अवमूल्यन होतंच असतं , हे असे आगावूपणे बोलणे बास झालं आता. ही कीड आता सगळीकडे पसरत चालली आहे परंतु आता पुण्यात हे होऊन दिलं जाणार नाही, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

काय लिहलंय पोस्टमध्ये?

मनसे चित्रपट सेनेचे शहराध्यक्ष चेतन अशोक धोत्रे यांनी आपल्या सोशल मिडिया फेसबुकवरती याबाबतची पोस्ट लिहली आहे. "रणवीर अलाहबादिया आणि सारंग साठे सारखेच ! रणवीर अलाहबादिया हा असं वक्तव्य करेल हे कोणालाही वाटलं नव्हतं. मात्र त्याच्या वक्तव्याने अनेकांची मान शरमेने खाली गेली. तसेच काहीसे आपल्या मराठीतील कलाकारांचे मराठी संस्कृतीचे ऑनलाइन धडे देणारे ‘भाडिपा’ (YouTube Channel) यांचा देखील थिल्लर चाळे चालणारा ‘अतिशय निर्लज्ज’ नावाचा शो मराठी माणसाच्या विचारसरणीला आणि अस्मितेला न शोभणारा आहे. या चॅनेलकडून अनेकदा स्वतःचा TRP वाढवण्याकरिता आपली संस्कृतीमूल्य, कुटुंबसंस्था यांचं वेळोवेळी अवमूल्यन होतंच असतं , हे असे आगावूपणे बोलणे बास झालं आता. ही कीड आता सगळीकडे पसरत चालली आहे परंतु आता पुण्यात हे होऊन दिलं जाणार नाही. त्यांनी लोकांची चांगल्या पद्धतीने करमणूक करावी त्याला मनसे चित्रपट सेना नेहमी साथ देईल. परंतु या बाकीच्या भानगडीत पडू नये."

"कार्यक्रमातील अनेक कमेंट मराठी माणसाला शरमेने मान खाली घालवणाऱ्या आहेत. परंतु आता यांच्या या लाईक सब्सक्राइबच्या अश्लील भाषेतील चाळ्यांना माफ केलं जाणार नाही. या पोस्ट च्या माध्यमातून मनसे चित्रपट सेनेकडून सारंग साठे आणि  सो कोल्ड भाडिपा चॅनलचा जाहीर निषेध करीत आहोत. यांच्या हाऊसफुल्ल होणाऱ्या शो ला जाताना मराठी माणसांनी आपल्या मराठी संस्कृतीचा एकदा विचार करा.यांचे यापुढील पुण्यातील कार्यक्रम मनसे चित्रपट सेना मनसे स्टाईलने बंद पाडणार इतके नक्की..!!"

रणवीर अलाहाबादिया वादाच्या भोवऱ्यात

प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. इंडियाज गॉट लेटेन्ट या कार्यक्रमात त्याने पालकांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे रणवीरने या विधानाबाबत माफी मागितली आहे. पण तरीही हा वाद संपताना दिसत नाहीये.

कोण आहे रणवीर अलाहाबादिया?

रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) हा प्रसिद्ध युट्यूबर असून त्याला ‘बीयरबाइसेप्स’ म्हणून देखील ओळखलं जातं. त्याचा पॉडकास्ट शो खूप चर्चेत असतो, आणि अनेक मान्यवरांनी त्याच्या पॉडकास्टला उपस्थिती लावली आहे. रणवीरने मुंबईतील ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’मधून आपलं प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर, रणवीरने उच्च शिक्षण ‘द्वारकादास जे सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ मध्ये पूर्ण केलं आहे.

रणवीरने शाळेतील काळातच युट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. सध्या तो एकूण 7 यूट्यूब चॅनेल चालवतो. त्याचं ‘बीयरबाइसेप्स’ चॅनेल चाहत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. या चॅनेलचे सुमारे 12 मिलियन फॉलोअर्स आहेत.