Priya Marathe & Subodh Bhave: मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे शनिवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ती 38 वर्षांची होती. गेल्या काही वर्षांपासून प्रिया मराठे (Priya Marathe Death) हिला कर्करोगाची लागण झाली होती. तिने यावर मातही केली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये कर्करोग पुन्हा तिच्या शरीरात पसरु लागला होता. तिच्यावर उपचारही सुरु होते. मात्र, शनिवारी पहाटे तिची प्राणज्योत मालवली. प्रिया मराठे (Priya Marathe) हिच्या अकाली जाण्याने मराठी रसिकांना मोठा धक्का बसला आहे. प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावरील अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केल्यामुळे तिचा चेहरा घराघरात पोहोचला होता. त्यामुळे तिच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
प्रिया मराठे हिच्या निधनानंतर अभिनेता सुबोध भावे याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. त्याने म्हटले की, " प्रिया मराठे " एक उत्तम अभिनेत्री, काही मालिका आणि चित्रपटात माझी सहकलाकार. पण माझ्यासाठी त्याही पेक्षा महत्त्वाच नातं तिच्या बरोबर होतं. प्रिया माझी चुलत बहीण. या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहेनत,कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या.प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली. काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सर च निदान झालं. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक, मालिका या मधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली. पण त्या कॅन्सरने काही तिची पाठ सोडली नाही. " तू भेटशी नव्याने " या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला. या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघेहा भक्कमपणे तिच्याबरोबर होता. माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली. प्रिया तूला भावपूर्ण श्रद्धांजली तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना. ओम शांती, असे सुबोध भावे याने आपल्या पोस्टमध्ये मह्टले आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रिया मराठे हिच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, तिचे शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. अखेर आज पहाटे प्रिया मराठे हिने मिरारोड येथील तिच्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. तिच्यावर दुपारी तीन वाजता मिरारोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.
आणखी वाचा
देव चांगल्या माणसांना का नेतो? अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता माळी काय म्हणाली?