Prem Mhanje Kay Asat : कला असली की, व्यक्तीला आपोआपच संधी मिळू लागतात. असचं काहीसं ऋतुजा टंकसाळे (Rutuja Tanksale) हिच्यासोबत घडलंय. साताऱ्याची ऋतुजा टंकसाळे ही नवोदित अभिनेत्री ‘प्रेम म्हणजे काय असतं’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. नव्या दमाच्या कलाकारांनी केलेला 'प्रेम म्हणजे काय असतं' (Prem Mhanje Kay Asat)  हा चित्रपट येत्या 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


तख्त प्रॉडक्शनने 'प्रेम म्हणजे काय असतं' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, प्रसाद दत्तात्रय इंगवले यांनी चित्रपटाचं लेखन,  दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी निभावली आहे. प्रेम ही संकल्पना अत्यंत वेगळ्या पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहे. उत्तम कथा, फ्रेश कलाकार, श्रवणीय संगीताचा मिलाफ या चित्रपटात झाला आहे.


रिक्षाचालक वडिलांची लेक होणार अभिनेत्री


ऋतुजा टंकसाळे ही साताऱ्याची तरुणी पहिल्यांदाच चित्रपटात अभिनय करत आहे. प्रेम म्हणजे काय असतं या चित्रपटात ऋतुजानं अपर्णा ही भूमिका केली आहे.ऋतुजाचे वडील रिक्षाचालक असून चित्रपटाची, अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातली ऋतुजा आपला पहिला चित्रपट प्रदर्शित होणार असल्यानं उत्साहात आहे. 'प्रेम म्हणजे काय असतं या चित्रपटातून मला खूप काही शिकायला मिळालं, चित्रपट हे माध्यम समजून घेता आलं. आता याच क्षेत्रात करिअर करायचं का हे ठरवलेलं नाही. पण संधी मिळाल्यास काम करायला नक्कीच आवडेल,' असं ऋतुजानं सांगितलं.


‘प्रेम म्हणजे काय असतं’ या चित्रपटातून निर्माते आणि दिग्दर्शकांनी अनेक नवोदित कलाकारांना सुवर्ण संधी दिली असल्याने या चित्रपटातील कलाकारांनी त्यांचे आभार मानले आहेत.


आठवणीच्या दुनियेत रमायला लावणारी प्रेमकथा!


प्रेम म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या काहीना काही आठवणी लगेच डोळ्यांसमोर तरळतात. अशाच आठवणीच्या दुनियेत रमायला लावणारी कथा घेऊन ‘प्रेम म्हजे काय असतं’ (Prem Mhanje Kay Asat) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र, त्यापूर्वी या चित्रपटाची एक छोटीशी झलक अर्थात टीझर रिलीज करण्यात आला आहे.


पाहा टीझर :



खळाळत वाहणाऱ्या धबधब्याजवळ प्रसन्नतेनं बसलेली लहान मुलगी आणि मोहरून जाणारा लहान मुलगा या टीजरमध्ये दिसतात. तसंच प्रेम म्हणजे काय हे सांगतानाच आपल्या आयुष्यातल्या प्रेमाची आठवण करून देणारा, जुन्या आठवणींनी नॉस्टॅल्जिक करणारा व्हॉईस ओव्हरही ऐकू येतो. चित्रपटाचं नाव आणि टीजरमधून चित्रपट रोमँटिक असेल असा अंदाज बांधता येत असला, तरी कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.


हेही वाचा :