Prathamesh Parab : अभिनेता प्रथमेश परबचा (Prathamesh Parab) 'श्री गणेशा' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण या सिनेमाला थिएटर मिळत नसल्याची खंत अभिनेत्याने व्यक्त केली आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधाननेही नुकतच याबाबत भाष्य केलं होतं. त्यानंतर आता अभिनेता प्रथमेश परब याने देखील पोस्ट करत यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.
मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही, अशी खंत कलाकारांकडून कायमच व्यक्त केली जाते. इतकच नव्हे तर आता मराठी सिनेमांना स्वतंत्र्य थिएटर द्यावीत अशीही मागणी कलाकार करत आहेत. प्रथमेशनेही यासंदर्भात भाष्य केल्याचं पाहायला मिळतंय. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळूनही मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाहीत, असं यावेळी प्रथमेशने म्हटलं आहे.
प्रथमेशची पोस्ट नेमकी काय?
प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, 'एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेते. त्याच्या स्क्रिप्टवर, व्यक्तिरेखेवर, नकळत प्रेम जडू लागतं. अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो. आपली व्यक्तिरेखा, त्यातलं वेगळेपण मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकाराला वाटतं.'
पुढे त्याने म्हटलं की, चित्रपट प्रदर्शित होतो. प्रेक्षकांना तो फार आवडतो. थिएटर visit केल्यानंतर त्याच्या live reactions, त्यांच्या डोळ्यांतील अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरुन साधलेला संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं. आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय...पण, तो दाखवायला आमच्याकडे थिएटर्सच नाहीत. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाही, यापेक्षा दुर्देवी काय असू शकतं...
तेजश्रीने काय म्हटलं?
सिनेमाला पुरेसे स्क्रिन्स मिळत नाहीत, यावर प्रतिक्रिया देताना तेजश्रीने म्हटलं की, मला अनेकांचे फोन येत आहेत. सिनेमा पाहायचा आहे, पण जवळच्या चित्रपटगृहात सिनेमा लागलेलाच नाही. ही गोष्ट खूपच वाईट आहे. यामध्ये प्रेक्षकांचंही अगदी बरोबर आहे. मराठी प्रेक्षक मराठी सिनेमाला पाहायला बाहेर पडत नाहीत, असंच आपण म्हणतो. पण जर तो सिनेमा थिएटरमध्ये लागलेलाच नसेल तर ते प्रेक्षक तरी काय करणार? असंच चित्र असेल तर मराठी सिनेमा चालणार तरी कसा? याच गोष्टीची मोठी खंत वाटते. जिथे मराठी प्रेक्षक राहतात तिथल्या थिएटरमध्येही सिनेमा लागला नसणं हे खरंच दुर्दैव आहे. इतका पाठपुरवठा केल्यानंतर आज आम्हाला विलेपार्ले येथे एक शो मिळाला.