Who Is Bhoomi Shetty: दिग्गज दिग्दर्शक प्रशांत वर्मा (Prasanth Varma) यांनी 2024 मध्ये 'हनु मान' (Hanu Man) सिनेमानं सर्वांची मनं जिंकली आण बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घातला. त्याचवेळी त्यांनी ही सुपरहिरो फ्रेंचायझी (Superhero Franchise) पुढे नेण्याची घोषणा केलेली. आता 'प्रशांत वर्मा सिनेमॅटिक यूनिवर्स'ची नवी फिल्म 'महाकाली'चं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. ज्यामध्ये भूमि शेट्टीचा लूक नक्कीच उत्साह आणि थरार वाढवणारा आहे. नावाप्रमाणेच हा चित्रपट माता कालीच्या कथेवर आधारित असेल. कथा प्रशांत वर्मा यांनी लिहिली आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये, त्याच चित्रपटातील 'असूरगुरू शुक्राचार्य' म्हणून अक्षय खन्नाचा लूकही समोर आला होता, ज्यामुळे सोशल मीडियावर बरीच खळबळ उडाली होती.
असं सांगितलं जातंय की, 'महाकाली' सिनेमाची 50 टक्क्यांहून अधिक शुटिंग पूर्ण झाली आहे. सध्या हैदराबादमध्ये उभारण्यात आलेल्या, भव्य सेटवर शुटिंग सुरू आहे. प्रशांत वर्मा यांनी फ्रँचायझीच्या पहिल्या चित्रपट 'हनु मान'मध्ये तेजा सज्जा सारख्या सुपरस्टारला कास्ट केलंय, तर भूमी शेट्टी ही 'महाकाली'मध्ये रुपेरी पडद्यावर जवळजवळ नवी आहे.
भूमी शेट्टी कोण?
अभिनेत्री भूमी शेट्टीचं खरं नाव भूमिका शेट्टी. ती यापूर्वी कन्नड टीव्ही मालिका 'किन्नरी' आणि तेलुगू मालिका 'निन्ने पेल्लादथा'मध्ये दिसलेली. ती टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस कन्नड'मध्ये देखील स्पर्धक होती. भूमी शेट्टीनं 2011 मध्ये 'इक्कत' या कन्नड चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ती कर्नाटकातील करावली प्रदेशातील कुंडापुराची रहिवाशी आहे. तिच्या वडिलांचं नाव भास्कर शेट्टी आणि आईचं नाव बेबी शेट्टी. भूमी शेट्टी तिच्या शालेय जीवनापासूनच कन्नड आणि तुळु भाषेत अस्खलित आहे. 'हैदराबाद टाईम्स'नं भूमी शेट्टीला 2018 ची 'मोस्ट डिजायरेबल वुमन ऑफ स्मॉल स्क्रीन' म्हणून निवडलेलं.
'महाकाली'चं विक्राळ रूप, डोळ्यांतला राग आणि करुणा
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलंय की, फिल्ममध्ये भूमी शेट्टीची कास्टिंग करण्यात आलीय कारण, मेकर्सना अशी अभिनेत्री हवी होती, जी कहाणीचा आत्मा पडद्यावर साकारू शकेल. यामध्ये 'महाकाली'च्या फर्स्ट लूकमध्ये भूमीचा चेहरा दिव्यता आणि गूढतेचा एक अनोखा मिलाफ दाखवतो, यात शंका नाही. लाल आणि सोनेरी रंगाचा पोषाख, पारंपारिक दागिने आणि पवित्र चिह्नांनी सजवलेल्या 'महाकाली'चं विक्राळ रूप, डोळ्यांत क्रोध आणि करुणा यामुळे भूमी शेट्टी अपेक्षा आणखी वाढवते.
दिव्य स्त्री शक्तीचं सार दर्शवणारी फिल्म
'महाकाली'बद्दल बोलताना प्रशांत वर्मा म्हणाले की, "हनु मान'नंतर, मी दिव्य स्त्रीत्वाचं सार खोलवर समजून घेण्यास आणि ते पडद्यावर जिवंत करण्यास आकर्षित झालो आणि 'महाकाली' पेक्षा अधिक योग्य काय असू शकतं. ती आपल्या इतिहासात आणि पौराणिक कथांमध्ये खोलवर रुजलेली एक वैश्विक शक्ती आहे. दरम्यान, आपल्या चित्रपट उद्योगात, तिला खरोखर पात्र असलेल्या भव्यतेनं क्वचितच चित्रित केलं गेलं आहे." ते म्हणाले की, भूमी शेट्टीला मुख्य भूमिकेत कास्ट केल्याबद्दल त्याला अभिमान आहे.